Marathi News> भारत
Advertisement

देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा लांबणीवर, अमित शहा यांनी दिला सबुरीचा सल्ला

Devendra Fadanvis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा केंद्रीय गृहमंत्री अमित यांची भेट घेतली. या भेटीत अमित शाहा यांनी देवेंद्र फडणवीस यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. शपथविधी झाल्यानंतर महाराष्ट्राबाबत सविस्तर चर्चा करुन असं अमित शाह यांनी म्हटलं आहे. 

देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा लांबणीवर, अमित शहा यांनी दिला सबुरीचा सल्ला

Devendra Fadanvis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आज पुन्हा एकदा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतली. काल रात्री अमित शाह यांच्या निवासस्थानी दोघांमध्ये दीड तास चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. सरकारमधून बाहेर पडण्याची आपली भूमिका ही कुठल्याही नाराजीतून नाही तर राज्यात पक्षसंघटनेला बळकटी आणण्यासाठीच असल्याचं फडणवासांनी अमित शाहांना सांगितल्याच कळतंय. याशिवाय संघटनेच्या कामात तळागाळातील कार्यकर्ता ते स्थानिक पातळीवरचे प्रश्न समजून घेत विधानसभेची जोरदार मोर्चेबांधणी करता येईल, सरकारच्या बाहेर राहून देखील सरकार व्यवस्थित चालवता येऊ शकतं असा विश्वासही दिला. यावर अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीस यांना सबुरीचा सल्ला दिला आहे.

काय म्हणाले अमित शाह?
देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री आणि आज दुपारी अशा दोन वेळा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. कालची अपूर्ण चर्चा आजच्या दुसर्‍या भेटीत पूर्ण झाली. फडणवीस यांचं संपूर्ण म्हणणं ऐकून घेतल्यानंतर अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीस यांना सध्या तुम्ही तुमचे काम सुरु ठेवा. नरेंद्र मोदी यांचा शपथविधी झाल्यानंतर आपण महाराष्ट्राबाबत (Maharashtra) सविस्तर चर्चा करुन निर्णय करु असं आश्वासन दिलं. महाराष्ट्रात काय करेक्टिव्ह उपाययोजना केल्या पाहिजेत, याचा आराखडा तयार करु. पण, तोवर तुम्ही आपले काम सुरु ठेवा, असे अमित शाह यांनी फडणवीस यांना स्पष्टपणे सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

महाराष्ट्रातील पराभवाची जबाबदारी
राज्यात भाजपने 28 जागा लढवल्या होत्या. मात्र, त्यापैकी 9 जागांवर भाजपला यश मिळाले आहे. त्यामुळं भाजपला मोठा धक्का बसला आहे. लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर (Loksabha Election Result) देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी मला सरकारमधून मोकळं करा, असं म्हणत उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचे संकेत दिले होते. फडणवीसांच्या या वक्तव्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली होती. 

देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी त्यांची मनधरणीदेखील केली. मात्र, देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्रीपद सोडण्यावर ठाम होते. विधानसभा निवडणुकीसाठी पूर्णवेळी काम करता यावे, यासाठी फडणवीसांनी हा निर्णय घेतला होता.  भाजपला महाराष्ट्रात जो सेटबॅक झाला आहे. त्याची जबाबदारी मी स्वतः घेतो. मला सरकारमधून मोकळं करा, अशी मागणी फडणवीसांनी पक्षातील नेत्यांकडे केली होती.

Read More