Marathi News> भारत
Advertisement

Video : मतदानानंतर EVM घेऊन जाणारी बस जळून खाक! सुदैवाने 36 अधिकारी बचावेल; पण..

Bus Carrying EVM Caught Fire: या बसमध्ये मतदानाशीसंबंधित 36 कर्मचारी प्रवास करत होते. अचानक या बसने पेट घेतला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवितहानी झाली नाही.

Video : मतदानानंतर EVM घेऊन जाणारी बस जळून खाक! सुदैवाने 36 अधिकारी बचावेल; पण..

Bus Carrying EVM Caught Fire: लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्स म्हणजेच ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या बसला आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशमधील बीतुल येथे तिसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर मंगळवारी रात्री ही घटना घडल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेनं दिली आहे. ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या बसने पेट घेण्याची घटना मुलताई तहसीलमधील गौला गावाजवळ घडली. या दुर्घटनेमध्ये अनेक ईव्हीएमचं नुकसान झालं आहे.

बसमध्ये होते 6 EVM

समोर आलेल्या माहितीनुसार, बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने आग लागली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही. या बसमध्ये 36 पोलिंग बूथ अधिकारी आणि सहा वेगवेगळ्या मतदानकेंद्रातील सहा ईव्हीएम मशिन्स होत्या. या सहापैकी 4 ईव्हीएम मशीनला या आगीचा फटका बसला आहे.

पोलिसांनी काय माहिती दिली?

बीतुलचे पोलीस निरिक्षक निश्चर झारिया यांनी सदर घटनेबद्दल अधिक माहिती दिली. "6 मतदान केंद्रातील ईव्हीएम घेऊन निवडणूक अधिकारी रवाना झाला. तांत्रिक अडचणीमुळे बसला आग लागली. यापैकी 2 ईव्हीएमला कोणतीही हानी झालेली नाही. मात्र यापैकी 4 मशिन्सला आगीचा फटका बसला असून या मशिन्सच्या काही भागांचं नुकसान झालं आहे. बसला आग लागली तेव्हा बसमध्ये 36 जण होते. या सर्वांनी बसच्या खिडक्यांच्या काचा फोडून बाहेर उड्या मारल्या. बसचा दरवाजा तांत्रिक अडचणीमुळे उघडत नसल्याने सर्वांनी आपत्कालीन मार्ग वर खिडक्यांमधून बाहेर उड्या घेतल्या. या लोकांना किरकोळ जखमा झाल्यात. त्यांना सर्वांना दुसऱ्या बसने पुढे पाठवण्यात आलं. या प्रकरणात गुन्हा दाखल करुन घेण्यात आला आहे," असं झारिया यांनी सांगितलं.

नक्की पाहा >> भाजपा नेत्याच्या अल्पवयीन मुलाने EVM वरील बटण दाबून केलं मतदान! धक्कादायक Video समोर

जिल्हाधिकाऱ्यांचं म्हणणं काय?

"आम्ही या दुर्घटनेसंदर्भातील अहवाल केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवाला आहे. ते जे काही निर्देश देतील त्याप्रमाणे आम्ही पुढील कारवाई करु. सर्व निवडणूक अधिकारी सुरक्षित आहेत. त्यांनी त्यांच्याकडील निवडणूक साहित्य जमा केलं आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार प्रथमदर्शनी ही आग तांत्रिक बिघाडामुळे लागल्याचं दिसत आहे," असं बीतुलचे जिल्हाधिकारी कुमार सूर्यवंशी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलता सांगितलं. 

या प्रकरणात सध्या पोलीस पुढील तपास करत आहेत.

Read More