Marathi News> भारत
Advertisement

जिरेटोप घातला आता पीएम मोदींना सिंहासनावरही बसवणार का? हिंदू महासेभेचा प्रफुल्ल पटेलांवर हल्लाबोल

PM Modi Varanasi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसीतून तिसऱ्यांदा लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रफुल्ल पटेल यांनी मोदींचा जिरेटोप देऊन सत्कार केला. आता यावरुन शरदचंद्र पवार गटाने प्रफुल्ल पटेल यांच्यावर टीका केली आहे.

जिरेटोप घातला आता पीएम मोदींना सिंहासनावरही बसवणार का? हिंदू महासेभेचा प्रफुल्ल पटेलांवर हल्लाबोल

PM Modi Varanasi : वाराणसीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांना घातलेला जिरेटोप (Jiretop) प्रफुल्ल पटेलांच्या (Praful Patel) चांगलाच अंगलट आलाय. छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप देऊन पंतप्रधानांचं स्वागत केल्यानं महाराष्ट्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्यायत. प्रफुल्ल पटेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही कृती महाराजांचा अवमान करणारी आहे असा हल्लाबोल आता हिंदू महासभेने (Hindu Mahsabha) केलाय. प्रफुल्ल पटेल यांच्याकडे ही लाचारी कुठून आली असा प्रश्नही हिंदू महासभेच्या आनंद दवेंनी उपस्थित केलाय. उद्या पंतप्रधान जर रायगडावर गेले तर त्यांना तिथल्या सिंहासनावर सुद्धा बसवणार का असा संतप्त सवाल आनंद दवे यांनी उपस्थित केलाय.

तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरेटोपाचा राजकीय नेत्यांनी अवमान करू नये असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिलाय. कोणत्याही कपड्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप घालणं ही न शोभणारी गोष्ट आहे. पंतप्रधान महोदय छत्रपती नाहीत. प्रफुल पटेल तुम्हाला समजलं पाहिजे, छत्रपतींचा जिरेटोप कधी घातला जातो असा हल्लाबोल संभाजी ब्रिगेडच्या संतोष शिंदे यांनी केला आहे. 

शरद पवार गटाकडूनही हल्लाबोल
प्रफुल्ल पटेल यांच्यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडूनही जोरदार हल्लाबोल करण्यात आला. शरद पवार गटाचे पुणे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी ट्विट करत प्रफुल पटेल यांच्यावर टीका केली आहे. जगताप यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय 'प्रफुल्ल पटेल लाज बाळगा, "जिरेटोप" आहे तो तुमच्या हातात अन् त्या बीभत्स माणसाच्या डोक्यावर शोभत नाही !रांझ्याच्या पाटलाचा चौरंगा करणारे छत्रपती शिवाजी महाराज कुठे.... अन् मणिपूरच्या महिलांची नग्न धिंड निघाली तरी गप्प बसणारे, बलात्कारी रेवन्ना, ब्रिजभूषण यांना मांडीवर खेळवणारे, बिल्कीस बानोच्या बलात्काऱ्यांना मुक्त सोडणारे ही बीभत्स बुध्दी कुठे, अशी टीका जगताप यांनी केलीय.

वाराणसीतून तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज
दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान मोदी यांनी वाराणसी मतदारसंघातून तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला.  पीएम यांच्याबरोबर अमित शहा यांच्यासह देशभरातील एनडीएचे प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पीएम मोदी यांचा जिरेटोप देऊन सत्कार करण्यात आला. 

पीएम मोदी यांनी वाराणसी लोकसबा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी गंगा नदीच्या किनारी दशाश्वमेध घाटावर पूजा केली. पंतप्रधानांनी वैदीक मंत्रोप्च्चार करत गंगा घाटावर आरतीही केली. पीएम मोदी यांसी सोशल मीडिया एक्स अकाऊंटवर काशीचा एक सुंदर व्हिडिओही शेअर केला आहे. त्याआधी सोमवारी काशी विश्वनाथ मंदिरात मोदींनी दर्शन घेतलं.

Read More