Marathi News> भारत
Advertisement

आता बस झालं, 'युद्धभूमी'वर उतरा, दहशतवादी हल्ल्यानंतर गंभीरचा संताप

दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपूरा येथे गुरुवारी दहशतवाद्यांनी स्फोट घडवून केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) वाहनला लक्ष्य केले.

आता बस झालं, 'युद्धभूमी'वर उतरा, दहशतवादी हल्ल्यानंतर गंभीरचा संताप

श्रीनगर : दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपूरा येथे गुरुवारी दहशतवाद्यांनी स्फोट घडवून केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) वाहनला लक्ष्य केले. यामध्ये सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले आहेत. उरी येथील हल्ल्यानंतर भारतीय लष्करावर झालेला हा सर्वात मोठा हल्ला आहे. पुलवामा जिल्ह्यात श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गाजवळ अवंतीपोरा भागातील गोरीपोरा येथे हा हल्ला झाला. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

या हल्ल्यानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरनं संताप व्यक्त केला आहे. 'फुटीरतावाद्यांशी चर्चा करा, पाकिस्तानशी चर्चा करा, पण यावेळचा संवाद टेबलवर नाही, तर युद्धभूमीवर करा. आता बस झालं', असं ट्विट गौतम गंभीरनं केलं आहे.

fallbacks

दरम्यान सीआरपीएफच्या जवानांवर झालेला दहशतवादी हल्ला हे अत्यंत घृणास्पद कृत्य आहे. मात्र, आम्ही भारतीय जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे.

प्राथमिक माहितीनुसार, सीआरपीएफच्या जवानांचा ताफा श्रीनगरहून जम्मूच्या दिशेने जात होता. यात दोन हजारांहून अधिक जवानांचा समावेश होता.  या मार्गावरील एका कारमध्ये दहशतवाद्यांनी आयईडी स्फोटकांचा साठा ठेवला होता. सीआरपीएफच्या वाहनांचा ताफा जवळ आल्यानंतर दहशतवाद्यांनी स्फोट घडवून आणला. आयईडी स्फोटानंतर गोळीबाराचेही आवाज येत होते. जखमींना तत्काळ श्रीनगर येथील रुग्णालयात हलवण्यात येत होते. पण १२ जवान वाटेतच शहीद झाले. यानंतर काही जवानांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. उर्वरित जखमी जवानांवर उपचार सुरू आहेत.

या हल्ल्यानंतर दक्षिण काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.  जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफच्या अन्य तुकड्यांना अवंतीपोरा येथे पाठवण्यात आहे. तसेच जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली असून संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम सुरु करण्यात आल्याचे समजते.

तत्पूर्वी जैश-ए- मोहम्मदने स्थानिक वृत्तवाहिन्यांना मेसेज करुन या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. आयईडी स्फोटके गाडीत लादण्यात आल्याचीही कबुलीही त्यांनी दिली. अदिल अहमद याने हा आत्मघातकी स्फोट घडवून आणला. अदिल हा पुलवामाच्या गुंडी बाग येथील रहिवासी होता.

Read More