Marathi News> भारत
Advertisement

अभिनेत्रीच्या फोटोवर अश्लिल कमेंट्स करणाऱ्याची हत्या; कन्नड सुपरस्टारबद्दल धक्कादायक खुलासे

Karnataka Murder Case: 

अभिनेत्रीच्या फोटोवर अश्लिल कमेंट्स करणाऱ्याची हत्या; कन्नड सुपरस्टारबद्दल धक्कादायक खुलासे

Karnataka Murder Case: कर्नाटक मर्डर केसमुळे संपूर्ण देश हादरला. यात कन्नडचा प्रसिद्ध अभिनेता दर्शन थुगुदीपचे नाव समोर आले. त्याच्या फॅन्ससाठी हा खूप मोठा धक्का होता. स्क्रीनवर इतका चांगला अभिनय करणारा दर्शन थुगुदीप असे काही करु शकतो हेच त्याच्या चाहत्यांना पटत नव्हते. आपला आवडता स्टार असे काही करणार नाही, हेच ते सुरुवातीला म्हणत होते. पण पोलीस तपासाचे धागे हळुहळू दर्शनच्या दिशेने जाऊ लागले आणि दर्शन सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. चित्रदुर्गा येथे राहणाऱ्या रेणुकास्वामी या इसमाच्या हत्येशी संबंधित हे प्रकरण आहे. त्याचा मृतदेह बेंगळुरूमधील नाल्याजवळ सापडला होता. या तपासात दिवसेंदिवस धक्कादायक माहिती समोर येत आहे.

अभिनेता दर्शनला त्याच्या चाहत्यांमध्ये 'चॅलेंजिंग स्टार' म्हणून ओळखले जाते. रेणुकास्वामीच्या हत्येप्रकरणी त्याला मंगळवारी म्हैसूरच्या फार्महाऊसमधून अटक करण्यात आली. दर्शनसोबत त्याची मैत्रीण पवित्रा गौडा आणि त्याच्या 11 साथीदारांनाही अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात पवित्रा गौडाला मुख्य आरोपी करण्यात आले असून दर्शनला दुसरा आरोपी करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली. 

चित्रदुर्गा येथे राहणारा रेणुकास्वामी हा सोशल मीडियावर सक्रीय होता. तो दर्शनची मैत्रिण पवित्रा गौडाच्या सोशल मीडिया पोस्टवर अश्लील कमेंट्स करायचा, असा आरोप आहे. यामुळे अभिनेता दर्शन खूप चिडला होता. दर्शनने रेणुकास्वामी कोण आहे? कुठे राहतो याबद्दल माहिती गोळा करायला सुरुवात केली. यासाठी त्याने चित्रदुर्गातील त्याच्या फॅन क्लबचे संयोजक राघवेंद्र उर्फ ​​रघू याला कामावर ठेवले. रघुचं त्याला आपल्या घरातून घेऊन गेला असा आरोप रेणुका स्वामीच्या पत्नीकडून करण्यात आला. रेणुकास्वामीचे अपहरण करण्यात आले. यानंतर त्यांना बेंगळुरूमधील कामाक्षिपल्या येथील एका शेडमध्ये नेण्यात आले. दर्शनने रेणुकास्वामी यांना त्या शेडमध्ये बेल्टने मारहाण केली. एवढेच नव्हे तर त्याच्या साथीदारांनी रेणुकास्वामीला लाठ्यांनी बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली. त्याला भिंतीवर आपटण्यात आले यानंतर त्याची हत्या करण्यात आली. पीटीआयने यासंदर्भात वृत्त दिले आहे. 

रेणुका स्वामीची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह पावसाच्या नाल्यात फेकण्यात आल्याचा आरोप आहे. कुत्रे त्याच्या शीरराचे लचके तोडत होते. त्यावेळी फूड डिलिव्हरी एक्झिक्युटिव्हला हे दिसले. त्याने तात्काळ पोलिसांना याबद्दलची माहिती दिली.दर्शन आणि पवित्रा गौडा तपासात सहकार्य करत नाहीत. तो वस्तुस्थिती लपवत असल्याचे कर्नाटक पोलिसांनी मंगळवारी रिमांड अर्जात न्यायालयाला सांगितले. अन्य चार आरोपींचाही शोध सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

अभिनेता दर्शनच्या अटकेवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया

अभिनेता दर्शनच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. आपल्या आवडत्या स्टारचा इतक्या भयानक गुन्ह्यात सहभाग असू शकतो यावर त्यांना अजूनही विश्वास बसत नाही. पोलीस ठाण्याबाहेर दर्शनाच्या चाहत्यांची गर्दी उसळलेली पाहायला मिळत आहे. गर्दी वाढत असल्याचे पाहून पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.  दर्शन आणि इतर आरोपींवर कारवाई करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य पोलिसांना दिल्याची माहिती कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वरा यांनी दिली.

याप्रकरणी कर्नाटक फिल्म चेंबर ऑफ कॉमर्सचे (केएफसीसी) अध्यक्ष एनएम सुरेश यांनी कलाकार युनियनशी चर्चा केली. पोलिसांनी या प्रकरणात आरोपपत्र दाखल केल्यानंतर दर्शनवर कारवाई करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

Read More