Marathi News> भारत
Advertisement

शोपियानमध्ये सुरक्षादलाकडून ३ दहशतवाद्यांना कंठस्नान

शोपियनमधल्या वाची इथे ही चकमक झाली.

शोपियानमध्ये सुरक्षादलाकडून ३ दहशतवाद्यांना कंठस्नान

श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये उडालेल्या चकमकीत भारतीय लष्कराने ३ दहशतवाद्यांचा खात्मा केला. शोपियनमधल्या वाची इथे ही चकमक झाली. अदिल शेख आणि वसिम वणी अशी मृत दहशतवाद्यांची नावं आहेत. हे दोघेही शोपियनचे रहिवासी होते. तर तिसऱ्या दहशतवाद्याची ओळख पटवण्याचं काम सुरु आहे.

हे तिघेही हिजबुल मुजाहिदीन या अतिरेकी संघटनेशी जोडलेले होते. यापैकी अदिल शेख यानं २०१८ मध्ये श्रीनगरमधले पीडीपीचे तत्कालीन आमदार एजाझ मिर यांच्याकडच्या ८ रायफली लुटल्या होत्या. याप्रकरणात त्याच्यावर आरोप आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका घरात दहशतवादी लपून बसले होते. लपलेल्या दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरु होता. या गोळीबारानंतर सेना, सीआरपीएफ आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या टीमकडून संयुक्तरित्या कारवाई करण्यात आली.

 

सुरक्षारक्षकांना शोपियांमधील वाची भागात पोलीस स्टेशनजवळ दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. सुरक्षारक्षकांकडून मिळालेल्या माहितीनंतर या भागात सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आलं. सुरक्षादलाकडून दहशतवादी लपलेल्या घराला घेराव घालण्यात आला, त्यावेळी दहशतवाद्यांनी तेथून पळण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी त्यांचा खात्मा करण्यात सेनेला यश आलं. या भागात सध्या सर्च ऑपरेशन सुरु आहे. 

  

Read More