Marathi News> भारत
Advertisement

Indian Railway : 'मजाक बनाके रखा है'; थर्ड AC चं तिकीट असूनही आता इतका वाईट प्रवास करावा लागणार?

Indian Railway Ticket : भारतीय रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुखकर अनुभव मिळणं दूर मनस्तापच जास्त मिळतोय. सद्यस्थिती पाहून तुम्हीही व्हाल हैराण.   

Indian Railway : 'मजाक बनाके रखा है'; थर्ड AC चं तिकीट असूनही आता इतका वाईट प्रवास करावा लागणार?

Indian Railway Ticket : भारतीय रेल्वे ही जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी देशांतर्गत रेल्वे सुविधा आहे. देशातील या रेल्वे विभागातून आतापर्यंत अनेकदा प्रवाशांच्या गरजा लक्षात घेता विविध भागांना जोडणारे रेल्वेमार्ग तयार करण्यात आले. इतकंच नव्हे, तर विविध उत्पन्नगटातील नागरिकांना केंद्रस्थानी ठेवत रेल्वेनं त्या अनुषंगानं रेल्वेसेवा पुरवण्याला प्राधान्य दिलं. 

काळ बदलला तसतशी रेल्वेही बदलत गेली आणि पाहता पाहता या सेवेत अनेक एसी रेल्वे जोडल्या गेल्या. लांब पल्ल्यांचा प्रवास लक्षात घेता काही रेल्वेंना एसी कोच अर्थात वातानुकूलित डबे जोडण्यात आले. रेल्वेच्या या सर्व सुविधा पाहता यास मिळणारा प्रतिसादही काही थोडाथोडका नव्हता. किंबहुना आजही बरेच प्रवासी रेल्वेच्या एसी कोचनं (लांब पल्ल्याचा प्रवास करतेवेळी) प्रवास करण्याला प्राधान्य देतात. त्यासाठी 1 हजारांहून महागातलं तिकीटही खरेदी करतात. 

महत्त्वाची बाब अशी, की महागातलं तिकीट काढूनही रेल्वे प्रवाशांना मात्र अपेक्षित असा सुखकर प्रवास मात्र करताच येत नाहीये. सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक फोटो हीच परिस्थिती दाखवत असून, जर हे चित्र बदललं नाही, तर मनस्ताप सहन करणाऱ्या प्रवाशांचा आकडा मोठा असेल हे नाकारता येत नाही. 

Indian Railway ची थट्टा झाली आहे... 

सोशल मीडियावर  (X/@nilishamantri_) या हँडलवरून एक फोटो शेअर करण्यात आला आणि त्यामुळंच ही परिस्थिती सर्वांसमोर आली. काही महिला प्रवाशांनी चेतक एक्स्प्रेसमधील थर्ड एसी कोचच्या तिकीटी काढल्या होत्या. आरामदायी प्रवासाच्या अपेक्षेनं त्यांनी तिकीटी काढल्या खऱ्या पण, रेल्वेमध्ये येताच त्यांच्या संपूर्ण डब्यात विनातिकीट प्रवास करणाऱ्यांचीच गर्दी असल्याचं लक्षात आलं आणि मनस्ताप पराकोटीला पोहोचला. 

प्रवास करणाऱ्या या महिलांमधील एकीनं या क्षणाचा फोटो टीपत तो सोशल मीडियावर शेअर केला. 'चेतक एक्स्प्रेसच्या 3 टियर एसीमध्ये सध्या अशी स्थिती आहे. भारतीय रेल्वेची थट्टा सुरुये. जनरल डब्यासारखेच धक्के खायचे असतील तर आम्ही मग इतका खर्च करून या एसी डब्याच्या तिकीटी का काढतो?' असा थेट प्रश्न या महिला प्रवाशांकडून रेल्वे मंत्रालय आणि रेल्वे मंत्र्यांना करण्यात आला. इतकंच नव्हे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे दाद मागत, इथं बसायलाही पुरेशी जागा नाही असा आर्जवी सूर आळवला. 

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या फोटोमध्ये दिसणारं दृश्य पाहता या महिलांनी नेमका कसा प्रवास केला असेल आणि त्यांना काय स्तरावर मनस्ताप सहन करावा लागला असेल याची प्रचिती येत आहे. रेल्वेमध्ये अशा बयावह प्रसंगाचा सामना तुम्ही कधी केला आहे का? कमेंटमध्ये कळवा. 

Read More