Marathi News> भारत
Advertisement

-४० डिग्रीमध्ये जवान करतात भारत-चीन सीमेचे संरक्षण

लडाखपासून अरूणाचल प्रदेशपर्यंत अतिशय खराब असणाऱ्या हवामानातही जवान सीमेवर आपली कामगिरी बजावत आहेत.

-४० डिग्रीमध्ये जवान करतात भारत-चीन सीमेचे संरक्षण

देहराडून : भारत-चीन सीमेवर अनेक ठिकाणी हवामान अतिशय खराब असून सर्वत्र बर्फवृष्टी होत आहे. अशा वातावरणात सीमेवर देखरेख ठेवणे कठीण काम आहे. भारत-चीन दरम्यान डोकलाम वादाला सुरूवात झाल्यापासून सीमेवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली गेली आहे. भारत आणि चीन सीमेवर हवामानाची अतिशय कठीण परिस्थिती असूनही आयटीबीपी(इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलीस) जवान सीमेवर देशसेवेसाठी तैनात आहेत. 

भारत-चीन सीमेवरील पर्वतांमध्ये दूर-दूरपर्यंत कोणतीही वस्ती नाही. इतकेच नाही तर या सीमेवर असणाऱ्या अनेक भागात रस्तेच नाहीत. जवानांना त्यांच्या बेस कॅप्मपर्यंत येण्यासाठी ५-६ दिवस लागतात. अशावेळी जवान बर्फातच घर बनवून आपलं संरक्षण करतात. अशा बर्फात बनवलेल्या घरांना इग्लू म्हणतात. जेव्हा मोठी बर्फवृष्टी, वादळाची परिस्थिती निर्माण होते त्यावेळी जवान या इग्लूत राहतात आणि वादळ थांबल्यानंतर पुन्हा टेहळणीसाठी बाहेर पडतात. 

'झी न्यूज हिंदी'शी बोलताना आयटीबीपीचे जवान सुनील कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा आम्ही टेहळणीसाठी निघतो त्यावेळी अनेकदा हवामान अचानक  खराब होऊन शीत लहरींचा मारा वाढतो, या हवामानापासून बचाव करण्यासाठी काही काळ थांबून पुन्हा परिस्थिती पूर्वपदावर येण्याची वाट पाहावी लागतचे. अनेकदा ही परिस्थिती संपतही नाही. 

सीमेवर संरक्षणासाठी फक्त पुरूष अधिकारी नव्हे तर महिला अधिकारीही तैनात असतात. याचविषयी अधिक माहिती देत, देशाची सेवा करणे ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याची बाब आयटीबीपीच्या जवान आरती सिंह यांनी अधोरेखित केली. त्यासोबतच प्रशिक्षणाच्या सुरूवातीला आलेल्या आव्हानांबाबतही सांगितलं

असे दिले जाते प्रशिक्षण 

वातावरणात होणारे बदल, हवामानाचा मारा आणि शत्रूचे आव्हान या कठीण परिस्थितीचा सामना करण्यासाठी तितकेच आव्हानात्मक प्रशिक्षण दिले जाते. अनेकदा कडाक्याच्या थंडीत, बर्फात जवानांना कपड्याविना कराटेचे प्रशिक्षण घ्यावे लागते शिवाय शत्रूशी दोन हात करण्याची युद्धनितीही शिकावी लागते. त्यासाठी त्यांचे शारीरिक स्वास्थ्यही सुदृढ राखणं तितकंच महत्त्वाचं असतं. ज्या जवानांना या सीमेवर तैनात केले जाते त्यांना सर्वात आधी उत्तराखंडच्या औली येथे असणाऱ्या 'माउंटेनिअरिंग अॅन्ड स्किंइंग इंन्स्टिट्यूट'मध्ये ६ महिन्यांचे कठीण प्रशिक्षण दिले जाते. या जवानांना या परिस्थितीत जिवंत राहण्यासाठी कराव्या लागणाऱ्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात. 'माउंटेनिअरिंग अॅन्ड स्किंइंग इंन्स्टिट्यूट'चे जीएस चौहान यांनी याविषयी विस्तृत माहीती दिली.

Read More