Marathi News> भारत
Advertisement

मी अध्यक्षपद सोडलेय, तातडीने नवा अध्यक्ष शोधा- राहुल गांधी

पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत २५ मे रोजी झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत राहुल गांधी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. 

मी अध्यक्षपद सोडलेय, तातडीने नवा अध्यक्ष शोधा- राहुल गांधी

नवी दिल्ली: मी आता काँग्रेसचा अध्यक्ष राहिलेलो नाही. त्यामुळे पक्षाने तातडीने नव्या अध्यक्षाची निवड करावी, असे राहुल गांधी यांनी सांगितले. ते बुधवारी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, मला काँग्रेसच्या अध्यक्षपदात रस नाही. त्यामुळे पक्षाने थोडाही उशीर न करता नव्या अध्यक्षाची निवड करायला पाहिजे. मी यापूर्वीच माझ्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे मी आता काँग्रेसचा अध्यक्ष नाही. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकारिणीची लवकरात लवकर बैठक व्हायला पाहिजे, असे मत राहुल गांधी यांनी व्यक्त केले. 

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी केरळच्या वायनाड मतदारसंघातून विजयी झाले होते. तर अमेठीमध्ये त्यांना भाजपच्या स्मृती इराणी यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र, या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला होता. या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत २५ मे रोजी झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत राहुल गांधी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी राहुल यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आपण निर्णयावर ठाम असल्याचे राहुल गांधी यांनी वेळोवेळी सांगितले आहे. 

राहुल गांधी त्यांचा निर्णय बदलण्याची शक्यता फारच कमी असल्याचे काही दिवसांपूर्वीच ज्येष्ठ काँग्रेस नेते वीरप्पा मोईली यांनी सांगितले होते. काँग्रेस कार्यकारिणी आता याबाबतचा निर्णय घेईल. काहीही घडू शकते. मात्र, राहुल गांधी स्वत:चा निर्णय बदलतील अशी एक टक्काही शक्यता मला वाटत नाही. त्यामुळे अध्यक्षपदासाठी दुसऱ्या व्यक्तीची निवड करण्यापूर्वी कार्यकारिणीचे सदस्य पुन्हा एकदा जरूर भेटतील, असे मोईली यांनी म्हटले होते. 

Read More