Marathi News> भारत
Advertisement

VIDEO : त्राहिमाम! मनिकरण साहिबकडे जाणारा पूल वाहून गेला; हिमाचल, उत्तराखंडमध्ये पुन्हा निसर्ग कोपला

Himachal Pradesh Rain : देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये सध्या निसर्ग कोपल्याचं पाहायला मिळत असून, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडसोबतच हरियाणामध्येही पावसामुळं हाहाकार माजल्याचं पाहायला मिळत आहे. 

VIDEO : त्राहिमाम! मनिकरण साहिबकडे जाणारा पूल वाहून गेला; हिमाचल, उत्तराखंडमध्ये पुन्हा निसर्ग कोपला

Himachal Pradesh Uttarakhand Rain : गेल्या तीन दिवसांपासून सुरु असणाऱ्या पावसानं हिमाचल प्रदेश, उत्तराखंडसोबतच दिल्ली, हरियाणा भागालाही झोडपलं आहे. सातत्यानं सुरु असणाऱ्या पावसामुळं हिमाचलमधील अनेक नद्यांन धोक्याची पातळी ओलांडली असून, आता त्या नद्यांनी रौद्र रुप धारण केल्याचं पाहायला मिळत आहे. वाटेत येईल ती गोष्ट प्रवाहात समामावून घेत या नद्या सध्या अतिप्रचंड वेगानं प्रवाहित झाल्याचं पाहायला मिळत आहे. 

अतीमुसळधार पावसामुळं हिमाचल प्रदेशात जलप्रलय आला आहे. येत्या काही काळासाठी इथं हीच परिस्थिती कायम राहणार असून, पुढील तीन दिवसांसाठी या भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आगे. तर, उत्तराखंडमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तिथं यमुनेचा जलस्तर वाढल्यानं दिल्लीकरांच्या चिंतेतही भर पडलीये. 

मनिकरण साहिबकडे जाणारा पूल वाहून गेला 

हिमाचलमध्ये पार्वती, बियास यांसारख्या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून, प्रचंड प्रमाणात चिखल, पाण्याचे लोट घेऊन या नद्या वाहत आहेत. कसोलपासून काही अंतरावर असणाऱ्या या हिमाचलमध्ये असणाऱ्या मनिकरण साहिब या गुरुद्वारापाशी जाणारा मुख्य पूल पार्वती नदीच्या प्रवाहामुळं होणाऱ्या माऱ्यानं वाहून गेला आहे. सुरुवातीला नदीचं पाणी पुलावरून जात होतं. पण, नंतर मात्र पाण्याचा प्रवास मोठा आणि अधिक तीव्र होत गेला आणि या पूलावर आदळत गेला. परिणामी पूलाचा मुख्य भागच वाहून गेला आहे. सोशल मीडियावर याची थेट दृश्य काही व्हिडीओंच्या माध्यमातून पाहता येत आहेत. 

ग्लेशियर फुटलं... 

तिथे उत्तराखंडमध्येही परिस्थिती वेगळी नाही. राज्यातील चमोली येथे जुम्मा गावापाशी असणारं ग्लेशिय फुटल्यामुळं नद्यांच्या पाणी पातळीच प्रचंड वाढ झाली आहे. ज्यामुळं नद्या डोंगरांवरून धडकी भरवणाऱ्या वेगानं वाहत आहेत. 

पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार गेल्या तीन दिवसांपासून झालेला पाऊस मागील 50 वर्षांपर्यंत हिमाचलनं पाहिला नव्हता. अशा या अस्मानी संकटामध्ये आतापर्यंत विविध भागांतून 20 जणांनी जीव गमावल्याची माहिती समोर येत आहे. प्राथमिक माहितीनुसार सध्याच्या घडीला हिमाचलमध्ये साधारण 3 ते 4 हजार कोटी रुपये इतकी वित्तहानी झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

हेसुद्धा वाचा : Maharashtra Rain Updates : कोकण- विदर्भात यलो अलर्ट; तुमच्या भागात काय परिस्थिती? 

पावसामुळं हिमाचलमध्ये झालेल्या नुकसानाचा आढावा घेता केंद्राकडून या परिस्थितीला राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करण्याची आर्जव हिमाचलचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी केली आहे. हिमाचलमध्ये सर्वाधिक नुकसान कुल्लू भागामध्ये झालं असून, इथं ट्रक, वाहनं नदीच्या पाण्यासोबत वाहून गेली आहेत. तर, मंडी येथे पंचवक्त्र मंदिर बियास नदीच्या पाण्याखाली गेलं आहे. 

पंजाब हरियाणातही पूरस्थिती कायम 

तिसऱ्या  दिवशी पंजाब आणि हरियाणा भागातही पावसानं जोरदार हजेरी लावल्यामुळं तिथंही पूरस्थिती उदभवली आहे. ज्यामुळं 13 जुलैपर्यंत या भागातील शाळा बंद राहतील. राजस्थानमध्येही पावसानं हजेरी लावल्यामुळं जनजीवन विस्कळीत झाल्याचं वृत्त समोर येत आहे. थोडक्यात देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये जायचा विचार करत असाल, आता तो विचार थोडा दूरच ठेवणं उत्तम! 

 

Read More