Marathi News> भारत
Advertisement

'लव्ह मॅरेज केलं तर हेच होणार' बहिणीची हत्या केल्यानंतर भावाने इन्स्टाग्रामवर रिल बनवला...

Honor Killing : ऑनर किलिंगची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मुलाने आपल्या बहिणीची गोळ्या झाडून हत्या केली. बहिणीच्या लव्ह मॅरेजमुळे भाऊ नाराज होता. आरोपीने बहिणीच्या सासरी जाऊन तिची हत्या केली.

'लव्ह मॅरेज केलं तर हेच होणार' बहिणीची हत्या केल्यानंतर भावाने इन्स्टाग्रामवर रिल बनवला...

Honor Killing : काही वर्षांपूर्वी आलेल्या 'सैराट' या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या ऑनर किलिंगची चांगलीच चर्चा रंगली. खोट्या प्रतिष्ठेसाठी कुटुंबातील तरुणाने आपल्या बहिणीची तिच्या सासरी जाऊन हत्या (Murder) केल्याचं या चित्रपटात दाखवण्यात आलं होतं. ही मानसिकता आजही समाजात कायम आहे. बहिणीच्या लव्ह मॅरेजमुळे (Love Marriage) नाराज असलेल्या भावाने तिच्या सासरी घरात घुसून तिची हत्या केली. धक्कादायक म्हणजे बहिणीची हत्या केल्यानंतर आरोपी भावाने इन्स्टाग्रावर एक रिल बनवला. आमच्या गावातील मुलीशी लग्न करेल तर हेच हाल होतील असं या व्हिडिओ तो तरुण म्हणताना दिसत आहे. आरोपीने पोलिसांसमोर शरणागती पत्करली असून याप्रकरणी अधिक तपास केला जात आहे. 

काय आहे नेमकी घटना?
ऑनर किलिंगची (Honor Killing) ही घटना हरियाणातल्या कैथल जिल्ह्यातील आहे. कैथल जिल्ह्यातल्या नानपुरी कॉलनी इथल्या खुराना रोड परिसरात राहाणाऱ्या अनिल कुमारचे क्योरक इथं राहाणाऱ्या कोमल राणीबरोबर प्रेमसंबंध होते. फेब्रुवारी महिन्यात या दोघांनी लग्न केलं. लग्नानंतर कोमल राणी सासरी गेली. पण या लग्नामुळे तिचं कुटुंब नाराज होतं. 

घटनेच्या दिवशी आरोपी भाऊ रमन मोटरसायकलने बहिण कोमलच्या घरी गेला. घरात घुसल्यानंतर रमनने बहिण कोमल, बहिणीची सासू कांता आणि नणंद अंजली यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात कोमलचा जागीच मृत्यू झाला. तर तिची नणंद आणि सासू गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. कोमलचे सासरे बंसीलाल यांनी दिलेल्या माहितीनुसार मुलगा अनिलने लव्ह मॅरेज केलं होतं. कोमलच्या भावाने अनिलच्या बहिण आणि आईवरही गोळीबार केला. अनिल आणि कोमलचं लग्न झाल्यापासून तिचं कुटुंब जीवे मारण्याची धमकी देत असल्याचंही बंसीलाल यांनी सांगितलं. काही दिवसांपूर्वीसुद्धा आरोपी रमण या ठिकाणी आला होता अशी माहिती बंसीलाल यांनी दिलीय.

आरोपी रमनने बनवला व्हिडिओ
आरोपी रमन हा अल्पवयीन असून बहिणीची हत्या केल्यानंतर तो पिस्तूल घेऊन थेट पोलीस स्थानकात पोहोचला आणि त्याने पोलिसांसमोर शरणागती पत्करली. पोलीस स्थानकात जाण्याआधी आरोपी रमनने इन्स्टाग्रामवर रिल बनवत बहिणीच्या हत्येची कबुली दिली. हत्या केल्यानंतर रमन कोमलच्या घरातून निघाला काही पावलं चालल्यानंतर त्याने तिथून रिक्क्षा पकली. रिक्क्षात बसल्यानंतर त्याने मोबाईल सुरु करत व्हिडिओ बनवला. यात त्याने 'माझ्या गावातील मुलीशी लग्न कराल तर हेच हाल होतील अशी धमकी दिलीय. बहिणीला मारलं आता त्या मुलाचाही हत्या करणार आहे, आज तो वाचला, गावातील जो मध्ये पडेल त्यांना बाहेर येऊन मारेन. आज मुलगी आणि तिची सासूला मारलं' असं म्हणताना दिसत आहे. बहिणीच्या हत्येचं त्याला जराही दु:खं नव्हतं. यानंतर पुढच्या व्हिडिओत त्याने बहिण कोमलचा पती अनिल कुमार आणि त्याच्या कुटुंबियांना शिव्या दिल्या आहेत. 

पाच आरोपींवर गुन्हा दाखल
बहिणीची हत्या केल्यानंतर आरोपी रमनला अटक करण्यात आली आहे. याशिवाय आरोपीचे आई-वडील आणि त्याच्या दोन मामांविरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अनिल आणि कोमलच्या लग्नानंतर कोमलच्या आई-वडिलांनी तिच्या घरी येण्या-जाण्यास सुरुवात केली होती. आता आपण नाराज नसल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळे अनिलच्या कुटुंबियांना पुरवण्यात आलेली सुरक्षा मागे घेण्यात आली होती. याचा फायदा घेत कोमलचा भाऊ रमनने तिच्या घरात घुसून तिची हत्या केली.

Read More