Marathi News> भारत
Advertisement

Happy Easter 2019 : ...म्हणून साजरा केला जातो ईस्टर संडे

देशभरात ईस्टर संडेच्या शुभेच्छांना उधाण, विविध ठिकाणच्या चर्चमध्ये गर्दी 

Happy Easter 2019 : ...म्हणून साजरा केला जातो ईस्टर संडे

मुंबई : Happy easter sunday 2019 साऱ्या देशात आणि विश्वातही रविवारची ही सकाळ उत्साह आणि आनंदाचं वातावरण घेऊन आली आहे. अर्थात त्यामागचं निमित्तचं तसंच आहे. ईस्टर संडेच्या निमित्ताने हे उत्साही आणि आनंदी वातावरण पाहायला मिळत आहे. ख्रिस्ती धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्त्व असणाऱ्या ईस्टर संडेच्या निमित्ताने शनिवारी मध्यरात्रीपासून शुभेच्छांना उधाण आल्याचं पाहायला मिळालं होतं. सोशल मीडिया म्हणू नका किंवा चर्चमधील मास म्हणू नका. प्रत्येक ठिकाणी ईस्टरचाच उत्साह पाहायला मिळत आहे. 

मुंबई, केरळ, तमिळनाडू, गोवा अशा विविध ठिकाणी असणाऱ्या चर्चमध्ये ख्रिस्त धर्मीयांनी प्रार्थनेसाठी गर्दी करण्यात सुरुवात केली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेकडून विविध चर्चमध्ये ईस्टरच्या निमित्ताने पार पडलेल्या मासचे फोटोही प्रसिद्ध करण्यात आले आहेत. ईस्टरच्या निमित्ताने अनेकांनीच चर्चमध्ये जात मेणबत्ती पेटवर येशू ख्रिस्तांकडे प्रार्थना केली असून, त्यांच्या अस्तित्वाविषयी आभार व्यक्त केले  आहेत. आजच्या दिवशी विविध ठिकाणी ईस्टरच्या निमित्ताने काही स्नेहभोजनाच्या कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात येतं. कुटुंब, समुदाय, मित्रपरिवार यांच्या एकत्र येण्याचा असा हा ईस्टर संडे. 

का साजरा केला जातो ईस्टर संडे? 

क्रुसावर ईसा मसीह अर्थात येशू ख्रिस्त यांनी देह त्याग केल्यानंतर त्यांचं पुनरुत्थान झालं होतं. ज्यानंतर ते जवळपास ४० दिवसांसाठी त्यांच्या अनुयायांसोबत आणि भक्तांसोबत वास्तव्यास होते. म्हणूनच हा दिवस म्हणजेच ईस्टर संडे साजरा करण्यात येतो. ख्रिसमस/ नाताळप्रमाणेच या दिवशी सर्वत्र आनंद आणि उत्साहाचं वातावरण असतं. 

गुड फ्रायडे या दिवशी येशू ख्रिस्त यांचं देहावसान झाल्यामुळे हा दु:खाचा दिवस मानला जातो. या दिवशी आपल्याला क्रुसावर चढवणाऱ्यांना क्षमा करण्यासाठीही येशू ख्रिस्त यांनी प्रार्थना केली होती. ते काय करत आहेत हे त्यांना ठाऊक नाही, असं म्हणत येशू ख्रिस्त यांनी त्याच्यासाठी क्षमायाचना केली होती. ज्यानंतर एके दिवशी ते पुन्हा आपल्या भक्तांच्या भेटीला आले होते. पुढे काही दिवस ते आपल्या भक्तांमध्ये वास्तव्यास राहिले, त्यामुळ हा दिवस ईस्टर संडे म्हणून साजरा करण्यात येतो. 

Read More