Marathi News> भारत
Advertisement

केरळमधील हत्तीणीच्या मृत्यूप्रकरणी एक जण ताब्यात

केरळ हत्तीणी प्रकरणात सोशल मीडियावर संतापाची लाट

केरळमधील हत्तीणीच्या मृत्यूप्रकरणी एक जण ताब्यात

केरळ : गर्भवती हत्तीणीच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर संतापाची लाट आहे. मनार्कड फॉरेस्ट टीमने गुरुवारी एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. या व्यक्तीची चौकशी केली जात आहे. ही व्यक्ती कोण आहे याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. स्थानिक पोलीसही या प्रकरणाचा सातत्याने तपास करत आहेत. त्याचबरोबर सरकारकडून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, हत्तीणीच्या मृत्यूच्या बाबतीत केंद्र सरकार खूप गंभीर आहे.

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी गुरुवारी म्हटले की, "केरळमधील मल्लपुरममध्ये हत्तीणीच्या हत्येबद्दल केंद्र सरकार गंभीर आहे. आम्ही योग्य चौकशी करुन दोषींना पकडण्यात कोणतीही कसर सोडणार नाही. हत्तीणीला फटाके खाऊन मारणे ही भारतीय संस्कृती नाही."

ज्या लोकांनी अननसात स्फोटके ठेवून हत्तीणीला खायला दिले होते अशा लोकांना पकडण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु झाले आहेत.

काय आहे प्रकरण?

केरळमधील मल्लपुरममधून मानवतेला हादरवून टाकणारे एक चित्र समोर आले आहे. येथे, एक गर्भवती हत्तीणी अन्नाच्या शोधात जंगलाजवळील गावात आली, पण तेथे काही विकृत लोकीनी अननसात फटाके भरले आणि हत्तीणीला खायला घातले, ज्याने तिच्या तोंडाला आणि जबड्यांना जबर जखम झाली.

वनविभागाच्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, स्फोटकामुळे हत्तीणीचे दातही तुटले होते. यानंतरही हत्तीणीने गावातील कोणाचेही नुकसान केले नाही आणि तिने वेलीयार नदी गाठली, जिथे ती तीन दिवस पाण्यात उभी राहिली. नंतर तिचा आणि तिच्या पोटात असलेल्या तिच्या पिल्लाचा मृत्यू झाला.

वनविभागाच्या अधिकाऱ्यांचा्या माहितीनुसार, हत्तीणी 14-15 वर्षांची असावी. 25 मे रोजी वन अधिकाऱ्यांना ही हत्तीणी मिळाली. 27 मे रोजी नदीत उभी असताना तिचा मृत्यू झाला. वनविभागाने तिचा जीव वाचविण्याचा प्रयत्न केला, पण काही होऊ शकलं नाही. भाजप खासदार आणि अ‍ॅनिमल राईट अॅक्टिव्हिस्ट मेनका गांधी यांनी केरळ सरकारला याबाबत सवाल केला आहे.

वनविभागाने अज्ञात लोकांवर गर्भवती हत्तीणीचा खून केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. यासाठी जबाबदार असलेल्या लोकांची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांची धरपकड करण्यासाठी प्रयत्न अधिक तीव्र केले गेले आहेत. मानव आणि प्राण्यांमध्ये संघर्षाची प्रकरणे पुढे येत असतात परंतु अशा प्रकारे स्फोटके देऊन हत्तीला मारण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Read More