Marathi News> भारत
Advertisement

भारतीय वैमानिकाला सोडा, माजी पाक पंतप्रधानांच्या नातीचा इम्रान सरकारला सल्ला

एका हवाई संघर्षानंतर बुधवारी पाकिस्ताननं भारतीय वैमानिकाला आपल्या ताब्यात घेतलं होतं

भारतीय वैमानिकाला सोडा, माजी पाक पंतप्रधानांच्या नातीचा इम्रान सरकारला सल्ला

वॉशिंग्टन : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान जुल्फिकार अली भुट्टो यांची नात आणि लेखिका फातिमा भुट्टो हिनंही बुधवारी पाकिस्तान सरकारच्या ताब्यात असलेल्या भारतीय वायुसेनेच्या वैमानिकाला सोडण्याचा सल्ला दिलाय. पाकिस्तानच्या इम्रान खान सरकारला हा सल्ला देतानाच फातिमा भुट्टो हिनं न्यूयॉर्क टाईम्समध्ये एक लेख लिहिलाय. 'मी आणि अनेक पाकिस्तानी युवक आमच्या देशाकडे आग्रह करतोय की शांती, मानवता आणि प्रतिष्ठेच्या प्रती आपली प्रतिबद्धता राखत संकेत म्हणून भारतीय वैमानिकाला सोडण्यात यावं' असं तिनं या लेखात म्हटलंय. फातिमा ही बेनझीर भुट्टो यांची भाची आहे. 

 

fallbacks

 

आम्ही आमचं संपूर्ण आयुष्य युद्धात घालवलंय. मी पाकिस्तानी आणि भारतीय सैनिकांना मरताना पाहू शकत नाही. माझ्या पिढीचे अनेक पाकिस्तानी लोक केवळ बोलण्याच्या आपल्या अधिकारासाठी लढत आहेत. आम्ही शांतीसाठी आपला आवाज उचलण्यासाठी कधीही घाबरणार नाही, असंही फातिमा भुट्टो हिनं म्हटलंय.

एका हवाई संघर्षानंतर बुधवारी पाकिस्ताननं भारतीय वैमानिकाला आपल्या ताब्यात घेतलं होतं. भारतीय वैमानिक अभिनंदन वर्थमान बुधवारी मिग २१ विमानातून सुरक्षित बाहेर पडले. परंतु, यावेळी ते नियंत्रण रेषा पार करत पाकिस्तानच्या बाजुला पडले होते. त्यानंतर त्यांना पाकिस्तानी सैन्याकडून ताब्यात घेण्यात आलं होतं.

यानंतर, जिनिव्हा करारानुसार भारतीय सेनेच्या विंग कमांडरची सुखरुप आणि लवकरच सुटका होऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जातेय. संयुक्त राष्ट्रसंघाच्या नियमानुसार, युद्धकैद्याला योग्य सन्मानासह त्याच्या राष्ट्राकडे हस्तांतरण करणं पाकिस्तानलाही बंधनकारक आहे. यासाठी सरकारचे हरएक प्रयत्नही सुरू आहेत.  

गुरुवारी पाकिस्तानातील भारतीय उच्चायोगानंही पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाला भारतीय वैमानिकाला लवकरात लवकर आणि सुखरूप भारताकडे सोपवण्याचा डेमार्श (राजनैतिक पाऊल) दिलाय. तसंच हीच सूचना नवी दिल्लीतील पाकिस्तानच्या उच्च आयुक्तांनीही देण्यात आलीय. 

Read More