Marathi News> भारत
Advertisement

राहुल गांधींच्या विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड, ट्विटमध्ये म्हणाले...

राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडिओही शेअर केलाय

राहुल गांधींच्या विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड, ट्विटमध्ये म्हणाले...

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक २०१९ साठी देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी  लगबगीनं रॅली करत आहेत. परंतु, आज सकाळी विमानाच्या इंजिनमध्ये काही बिघाड झाल्यानं त्यांना दिल्लीला परतावं लागलंय. राहुल गांधी यांनी एका ट्विटद्वारे याबद्दल माहिती दिलीय. सोबतच विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यानंतर आपल्याला दिल्लीला परतण्यासाठी दबाव आणण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. यामुळे देशातील वेगवेगळ्या राज्यांत होणाऱ्या त्यांच्या बैठकांना आणि सभांना उशीर होत असल्याची माहिती त्यांनी दिलीय. 

'आज पाटणासाठी निघाणाऱ्या विमानाच्या इंजिनमध्ये काही बिघाड झाला. त्यानंतर आम्हाला दिल्लीला परतण्यासाठी दबाव आणण्यात आला. यामुळे समस्तीपूर (बिहार), बालासोर (उडीसा) आणि संगमनेर (महाराष्ट्र) मध्ये आयोजित करण्यात आलेल्या बैठकींना उशीर होईल. असुविधेसाठी क्षमा याचना' असं आपल्या ट्विटमध्ये राहुल गांधी यांनी म्हटलंय.

राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडिओही शेअर केलाय. यामध्ये ते स्वत: विमानात बसलेले दिसत आहेत.

आज राहुल गांधी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेरमध्ये प्रचारसभा घेणार आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघात चौथ्याच्या टप्प्याच्या प्रचारासाठी राहुल गांधी येत आहेत. शिर्डीत शिवसेनेचे सदाशिव लोखंडे आणि काँग्रेसचे भाऊसाहेब कांबळे यांच्यात थेट लढत होत आहे. राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रात आत्तापर्यंत नागपूर, वर्धा, चंद्रपूर, नांदेड इथे सभा झाल्या आहेत. तर पुण्यात त्यांनी विद्यार्थ्यांशी खुला संवाद साधला होता. मात्र मुंबईतल्या प्रचाराकडे काँग्रेसचं दुर्लक्ष झाल्याची चर्चा रंगत आहे. 

 

Read More