Marathi News> भारत
Advertisement

गोव्यातील घडामोडींना वेग; दिगंबर कामत भाजपमध्ये प्रवेश करणार?

२००५ साली कामत भाजपा सोडून काँग्रेसमध्ये सहभागी झाले होते.

गोव्यातील घडामोडींना वेग; दिगंबर कामत भाजपमध्ये प्रवेश करणार?

पणजी: गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रकृती खालावल्याच्या वृत्तानंतर येथील राजकीय परिस्थिती पुन्हा एकदा अस्थिर झाली आहे. काँग्रेसने शनिवारीच भाजप सरकार अस्थिर असल्याचे सांगत राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला होता. यानंतर दिल्लीत भाजपकडून चक्रे फिरायला सुरुवात झाली आहे. आज सकाळीच भाजपच्या निवडणूक समितीची बैठक पार पडली. तेव्हापासून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिगंबर कामत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. दिगंबर कामत हे सध्या दिल्लीत असून ते भाजप नेत्यांच्या भेटीगाठी घेत असल्याचे समजते. २००५ साली कामत भाजपा सोडून काँग्रेसमध्ये सहभागी झाले होते. २००७ ते २०१२ या काळात त्यांनी गोव्याचे मुख्यमंत्रीपदही भुषवले होते.

याशिवाय, काँग्रेसचे काही आमदारही आमच्या संपर्कात असल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. त्यामुळे गोव्यातील राजकीय घडामोडींना कमालीचा वेग आला आहे. मात्र, काँग्रेसने कामत यांच्या भाजप प्रवेशाचे वृत्त फेटाळून लावले. भाजपला सत्ता जाण्याची धास्ती आहे. त्यामुळेच त्यांच्याकडून चुकीच्या बातम्या पसरवल्या जात असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले. 

गोव्यातील भाजप सरकार अस्थिर, काँग्रेसचा सत्तेचा दावा

तत्पूर्वी शनिवारी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रकृती ढासळल्याचे वृत्त समोर आले होते. रक्तदाब कमी झाल्यामुळे त्यांना झोपून राहावे लागत आहे. मात्र, कृत्रिम ऑक्सिजन लावण्यात आल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे राज्याचे मंत्री आणि गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते विजय सरदेसाई यांनी सांगितले. 

Read More