Marathi News> भारत
Advertisement

आईच्या निधनामुळे हिमाचलच्या उपमुख्यमंत्र्यांच्या लेकीचा लोकसभा लढवण्यास नकार; काँग्रेसला कळवलं

HP Deputy CM Daughter Refuses To Contest Loksabha Elections: या राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यामध्ये म्हणजेच 1 जून 2024 रोजी मतदान पार पडणार आहे. मात्र येथून उभं राहण्यास या तरुणीने नकार दिला असून तसं तिने पक्षाला कळवलं आहे.

आईच्या निधनामुळे हिमाचलच्या उपमुख्यमंत्र्यांच्या लेकीचा लोकसभा लढवण्यास नकार; काँग्रेसला कळवलं

HP Deputy CM Daughter Refuses To Contest Loksabha Elections: एकेकीडे उमेदवारी मिळवण्यासाठी अनेकजण शक्य ते सर्व प्रयत्न करताना दिसत आहेत. अगदी पक्षांतर करण्यापासून ते बंडखोरीपर्यंत आणि अपक्ष उभं राहण्यापासून ते छुपा विरोध करण्यापर्यंत अनेक माध्यमांमधून आपली नाराजी हे संभाव्य उमेदवार व्यक्त करताना दिसत आहेत. असं असतानाच दुसरीकडे हिमाचलमध्ये मात्र एक वेगळेच चित्र पाहायला मिळालं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री यांची कन्या अशता अग्नीहोत्री यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. अशता यांनी निवडणूक लढण्यास नकार देण्यामागील कारणासंदर्भात खुलासाही केला आहे. फेब्रुवारी महिन्यामध्येच माझ्या आईचं निधन झालं. त्यामुळे मी सध्या या निवडणुकीपासून दूर राहू इच्छिते असं अशता यांनी स्पष्ट केलं आहे.

बाप-लेकीने दिला नकार

काँग्रेस हमिरपूर लोकसभा मतदारसंघातून अशता अग्निहोत्री यांना निवडणुकीच्या रिंगणात उभं करण्याच्या तयारीत होती. याच मतदारसंघातून चार वेळा खासदार म्हणून निवडून आलेले अनुराग ठाकूर निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघातून अशता यांना उमेदवारी देण्याच्या हलचालींआधी मुकेश अग्निहोत्रींना उमेदवारी देण्याचे प्रयत्न सुरु होते. मात्र मुकेश अग्निहोत्रींनी पत्नी सिमी अग्निहोत्री यांचं निधन झाल्याचा संदर्भ देत खासगी कारणामुळे निवडणूक लढवण्याची इच्छा नसल्याचं पक्षाला कळवलं होतं. आता त्यांच्या मुलीनेही आईच्या निधनाचं कारण देत निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केल्याचं वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

मी लढणार नाही

अशता अग्निहोत्री यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन केलेल्या पोस्टमध्ये, "माझी आई प्राध्यापक सिमी अग्निहोत्रींच्या अनुपस्थितीत जगण्याचा मी प्रयत्न करत आहे. या प्रयत्नांमध्ये मी चाचपडत, रस्ता शोधत आहे. या दु:खद कालावधीमध्ये मला लोकसभा किंवा विधानसभेमध्ये प्रवेश करण्याची इच्छा नाही," असं म्हटलं आहे. अशता यांनी आपल्या फेसबुक पेजवरुन प्रसारमाध्यमांशी चर्चा करतानाचा व्हिडीओही शेअर केला आहे. यामध्येही त्यांनी आपल्याला निवडणूक लढायची नाही, असं म्हटलं आहे. 

आईला आदरांजली अर्पण करण्याचा काळ, निवडणूक लढवण्याचा नाही

"राजकारण बाजूला ठेऊन थोडं पाहिलं तर, माझ्या आईच्या आठवणींमुळे मी आतून हादरुन गेले आहे. हा वेळ तिला आदरांजली अर्पण करण्याचा असून निवडणूक लढण्याचा नक्कीच नाही. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी आणि इतर सर्वांनी हा प्रस्ताव मांडला त्यासाठी मी त्यांची आभारी आहे," असं अशता यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. गुरुवारी मुकेश अग्नीहोत्री यांनी अशता अग्निहोत्री यांच्या व्हेरिफाइड फेसबुक अकाऊंटवरुन अशीच एक पोस्ट केली आहे.

कशामुळे झालं निधन?

सीमी अग्नीहोत्री यांचं 9 फेब्रुवारी आकस्मिक निधन झालं. हृदयविकाराचा झटका आल्याने सिमी यांची प्राणज्योत मालवली. त्या 56 वर्षांच्या होत्या.

नक्की वाचा >> मुख्यमंत्री म्हणाले, 'ही पक्षाच्या गरीब उमेदवार'; महिला निघाली 161 कोटींची मालकीण! राज्यभर चर्चा

राज्यात एकूण 4 जागा, मतदान 1 जूनला

काँग्रेसने राज्यातील सार्वजनिक बांधकाममंत्री विक्रमादित्य सिंह यांना मंडीमधून तर कसौलीचे आमदार विनोद सुल्तानपुरी यांना शिमल्यातून उमेदवारी जाहीर केली आहे. माजी मंत्री अशा कुमारी आणि माजी आमदार सतपाल रिझादा यांनाही अनुक्रमे कांगरा आणि हमिरपूर मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. हिमाचलमधील चारही लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान शेवटच्या टप्प्यात म्हणजे 1 जून रोजी होणार आहे.

Read More