Marathi News> भारत
Advertisement

ना बोलणं, ना OTP, एक मिस कॉल आला, 50 लाख घेऊन गेला

 बँक अकाऊंटमधून 50 लाख गायब झाल्याचा मेसेज आल्यामुळे त्या व्यक्तीच्या पायाखालची जमीनच सरकली.   

ना बोलणं, ना OTP, एक मिस कॉल आला, 50 लाख घेऊन गेला

प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई : सायबर गुन्ह्यांच्या (Cyber Crime) दुनियेत नवा स्कॅम आलाय. यात ना ओटीपी (OTP) पाठवला जातो. ना कुठली माहिती तुमच्याकडे मागितली जाते. फक्त एक मिसकॉल (Miss Call) तुमचा बँक अकाऊंट (Bank Account) खाली करतो. नक्की हा स्कॅम आहे तरी काय, यात नक्की फसवणूक कशी होते, तुमच्यासोबत अशी फसवणूक होऊ नये म्हणून या स्कॅमबाबत आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. (cyber crime director of a security agency in delhi filed a similar fraud case with cyber department)

अनेकांना मिस कॉल, ब्लँक कॉल येतात. आपण फोनवर हॅलो-हॅलो बोलत राहतो, पण दुसरीकडून कोणताच आवाज येत नाही. थोडा वेळ प्रयत्न करुन आपण फोन ठेवून देतो. पण हा मिस कॉल तुमचं बँक अकाउंट रिकामं करू शकतो. बसला ना तुम्हाला धक्का. हो मिस कॉलनं बँक अकाऊंट रिकामं करणारा ऑनलाईन फ्रॉड समोर आलाय. यात ना फोनवर बोलणं होतं ना ओटीपी येतो. दिल्लीत एका सुरक्षा एजन्सीच्या संचालकानं असाच फसवणुकीचा गुन्हा सायबर खात्याकडे दाखल केलाय. या महाशयांना थोडा थोडका नव्हे तर तब्बल 50 लाखांचा गंडा घालण्यात आलाय.

मिस कॉलमुळे पैसे कसे उडाले?

पीडित व्यक्तीनं बँक अकाऊंटसंबंधी गोपनीय माहिती कुठेही शेअर केली नाही. OTP देखील शेअर केला नाही. सकाळी 7 ते 8.45 या वेळेत अनेक मिस कॉल आल्याचं तक्रारीत म्हटलंय. पीडित व्यक्तीने आधी याकडे दुर्लक्ष केलं पण सतत फोन येत असल्यानं त्यानं फोन उचलला. पण आवाज येत नसल्यानं तो हॅलो हॅलो करत राहिला. थोड्याच वेळात त्याच्या मोबाईलवर एक मेसेज आला. अकाऊंटमधून 50 लाख रुपये काढण्यात आल्याचा हा मेसेज होता.

बँक अकाऊंटमधून 50 लाख गायब झाल्याचा मेसेज आल्यामुळे त्या व्यक्तीच्या पायाखालची जमीनच सरकली. पण तज्ज्ञांचं म्हणणं आहे की फक्त मिस कॉल देऊन पैसे गायब होऊ शकत नाहीत. तुमचं लक्ष विचलित करण्यासाठी असे कॉल हॅकर्सकडून केले जातात. तो त्यांच्या रणनीतीचा भाग असतो. मिस कॉलद्वारे स्कॅम हा सिमकार्डशी निगडीत असून त्याला सिम स्वॅप फ्रॉड म्हणतात. हा सिम स्वॅप फ्रॉड नेमका काय आहे पाहुयात.

सिम स्वॅप फ्रॉड काय आहे?

मेसेज किंवा मेलद्वारे तुम्हाला मालवेअर पाठवलं जातं. मालवेअरद्वारे तुमची गोपनीय माहिती चोरली जाते. स्कॅमर्स याचदरम्यान सातत्यानं फोन करून सिम कार्ड डिअॅक्टीव्हेट झाल्याचा बनाव रचतात. त्याचदरम्यान तुमच्या सिम प्रोव्हाईडर कंपनीशी संपर्क साधून सिम अॅक्टीव्हेट करण्याची विनंती करतात. सिम कार्ड सक्रिय करण्यासाठी मिस कॉल उचलण्याचा सल्ला देतात. तुमच्याकडून मिस कॉल उचलला गेल्यामुळे डुप्लिकेट सिम अॅक्टीव्ह होतं.  सिम स्विचींग झालं की तुमच्या मोबाईल सिमचा पूर्ण ताबा हॅकर्सकडे जातो. तुमच्या फोनवर आलेला ओटीपी त्यालाही येतो. हॅकर्सकडे आलेल्या ओटीपीच्या जोरावर तुमचं अकाऊंट रिकामं करतात. 

बँकेकडून अनेकदा कोणाशीही आपला ओटीपी शेअर न करण्याचं सांगितलं जातं. मात्र या प्रकरणात मिस कॉलद्वारे फसवणूक करण्यात आलीय. कोणतेही बँक डिटेल्स मागण्यात आले नाहीत, किंवा ओटीपीही मागण्यात आला नाही. फोनवर केवळ हॅलो-हॅलो केल्यानंतरच अकाउंटमधून पैसे गायब झालेच समजा. तुम्हाला जर सातत्यानं मिस कॉल किंवा ब्लँक कॉल येत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. त्यादरम्यान आलेल्या मेसेजकडे दुर्लक्ष करु नका, थेट बँकेशी संपर्क साधा. हाच यातून वाचण्याचा एकमेव उपाय आहे.

Read More