Marathi News> भारत
Advertisement

देवा तुला शोधू कुठं? पावसामुळं केदारनाथला आलेल्या भाविकांना पडला प्रश्न; अर्ध्या वाटेतच अडकले यात्रेकरु

Chardham Yatra 2023 : उत्तराखंडमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसानं धुमाकूळ घातला असून, या पावसाच्या धर्तीवर चारधाम यात्रा काही काळासाठी थांबवण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनानं घेतला होता.   

देवा तुला शोधू कुठं? पावसामुळं केदारनाथला आलेल्या भाविकांना पडला प्रश्न; अर्ध्या वाटेतच अडकले यात्रेकरु

Kedarnath Yatra 2023 : साधारण महिन्याभरापासून सुरु असणाऱ्या चारधाम यात्रेत मागील काही दिवसांपासून पाऊस व्यत्यय आणताना दिसत आहे. उत्तराखंडमध्ये बदलणाऱ्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनही गरजेनुसार यात्रा तात्पुरती स्थगित करत हवामान सुधारताच ती पुन्हा सुरु करताना दिसत आहे. असं असलं तरीही सध्या नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. कारण ठरतंय केदार घाटीमध्ये क्षणात बदलणारं हवामान. 

गेल्या काही तासांपासून सुरु असणाऱ्या मुसळधार ते अतीमुसळधार पावसामुळं केदारनाथ मंदिराकडे जाण्याचा मार्ग बंद करण्यात आला होता. ज्यामुळं प्रवासी यात्रामार्गावर विविध ठिकाणी अडकले. आता मात्र पावसाचा जोर काही अंशी कमी होताच यात्रेकरुंना सोनप्रयाग येथून पुढे पाठवण्यात आलं आहे. पावसाचा जोर वाढल्यामुळं सोनप्रयाग आणि गौरुकुंड येथे जवळपास 1500 यात्रेकरू अडकले होते. पण, शुक्रवारी दुपारच्या सुमारास त्यांना पुढच्या रोखानं प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली. 

यात्रेत अडथळे येणं सुरुच... 

केदारनाथ मंदिरापर्यंत जाणाऱ्या मार्गामध्ये यात्रा एका टप्प्यावर सुरु झाली असली तरीही पुढच्या टप्प्यावर पोहोचेपर्यंत ती सुरुच असेल असं नाही. कारण, केदार घाटीमध्ये पावसाचा जोर वाढताच तिथं यात्रेकरुंना सुरक्षित स्थळी थांबण्यालं आवाहन करण्यात येतंय. पायवाटेवर दरडी आणि पाण्याचे लोट वाहून येण्याचा धोका असल्यामुळं ही यात्रा काही टप्प्यांवर अजुनही थांबलेलीच आहे. यात्रेदरम्यान येणारे हे अडथळे पाहता जीव मुठीत घेऊन प्रवास करणाऱ्या भाविकांच्या मनात पावसाच्या माऱ्यामुळं चिंताही वाटत आहे. 

बद्रीनाथ महामार्गावर भूस्खलन 

मागील काही दिवसांपासून उत्तराखंडमधील बऱ्याच मार्गांवर भूस्खलन झाल्याची माहिती समोर आली. त्यातच चमोली येथे झालेल्या मुसळधार पावसामुळं बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीवरही याचे परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं होतं. तब्बल 17 तासांनंतर या महामार्गावरील वाहतूक धीम्या गतीनं सुरु झाली असली तरीही ती पूर्ववत झालेली नाही, ज्यामुळं अनेक प्रवाशांना वाहनामध्येच रात्र घालवावी लागली. 

हेसुद्धा पाहा : Amarnath Yatra 2023 : रहस्य आणि श्रद्धेचा मेळ; वाचा अमरनाथाची 'अमर कथा'

उत्तराखंडमध्ये पावसाचा यलो अलर्ट 

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार पुढील 4 दिवस उत्तराखंडमधील बहुतांश भागांमध्ये ढगाळ वातावरण असेल. सध्याचं पर्जन्यमान पाहता राज्याच्या काही भागांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. काही भागांमध्ये मुसळधार पावसाची हजेरी तर काही भागांमध्ये पावसाची रिपरिप सुरु राहील. शुक्रवारी पर्वतीय भागांमध्ये अती मुसळधार पाऊस होईल अशी शक्यत हवामान विभागानं वर्तवली आहे. तर, बागेश्वर, नैनीताल, टिहरी, चमोली आणि पिथौरगड भागात पावसामुळं परिस्थिती बिघडू शकते. 

 

 

 

Read More