Marathi News> भारत
Advertisement

ऑक्सिजनअभावी मृत्यूंवरून राजकारण जोमात, विरोधक - केंद्र सरकार आमने सामने

केंद्र सरकारविरोधात विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव आणण्याचा विरोधकांचा निर्णय 

ऑक्सिजनअभावी मृत्यूंवरून राजकारण जोमात, विरोधक - केंद्र सरकार आमने सामने

नवी दिल्ली : ऑक्सिजन अभावी देशात एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही, असं उत्तर काल केंद्र सरकारने राज्यसभेत दिलं होत. यावरुन आता देशभरात राजकारण तापलं असून विरोधक प्रचंड संतापले आहेत. काँग्रेस आणि आपकडून केंद्र सरकारविरोधात विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

काँग्रेसच्या सदस्यांनी सरकारच्या दाव्यावर आक्षेप घेत जोरदार टीका केली.  ऑक्सिजनअभावी देशातील प्रत्येक राज्यात कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पण आरोग्य राज्यमंत्री सभागृहाची दिशाभूल करत आहेत. त्यांच्या विरोधात हक्कभंगाचा ठराव आणण्याचा इशारा काँग्रेसचे खासदार के. सी. वेणुगोपाल यांनी दिला होता.

'केंद्राच्या दाव्याने आम्हाला धक्काच बसला'

ऑक्सिजनअभावी देशात एकही मृत्यू न झाल्याच्या दाव्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्याला धक्का बसल्याचं विधान केलं आहे.  'कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन अभावी मरण पावलेल्यांच्या नातलगांनी मोदी सरकारवर खटलाच दाखल करायला हवा, असं खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटलं आहे. ऑक्सिजन अभावी शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे आणि ते सत्य आहे, असंही ते म्हणाले.

'केंद्र सरकारने कोणतीही सक्रियता दाखवली नाही'

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनीही केंद्र सरकारच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. यासंदर्भात त्यांनी एक ट्विट  केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलंय, 'मृत्यू यामुळे झाले, कारण, सरकारनं ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट करणाऱ्या टँकरची व्यवस्था केली नाही. मृत्यू यामुळे झाले कारण, एम्पावर्ड ग्रुप आणि संसदीय समितीचा सल्ला कानामागे टाकून ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यासाठी कोणतीही तयारी केली नाही. रुग्णालयांत ऑक्सिजन प्लान्ट लावण्यासाठी कोणतीही सक्रियता दाखवली नाही'. 

 

विरोधकांना भाजपचं उत्तर

दरम्यान, विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना भाजपने उत्तर दिलं आहे. 'केंद्रानं मृतांचे जे आकडे संसदेत मांडले, ते केंद्राचे नसून राज्यांनी दिलेले आकडे आहेत. त्यामुळे विरोधी पक्षांची जर अशी तक्रार असेल, की केंद्रानं चुकीची आकडेवारी दिली आहे, तर त्या पक्षांनी आधी इतर राज्यांना विचारावं की त्यांनी खरी आकडेवारी केंद्राला दिली होती का?” असा सवाल देखील संबित पात्रा यांनी उपस्थित केला आहे.

संबित पात्रा यांनी खासदार संजय राऊत आणि महाराष्ट्र सरकारवरही टीका केली आहे. संजय राऊत यांनी म्हटलं आहे की आम्हाला धक्का बसला, पण खोट्या बाबींवर तुम्ही राजकारण करत असाल तर आम्हाला धक्का बसला आहे, तुम्ही गंभीर विषयांवर केवळ राजकारण करत आहात असं संबित पात्रा यांनी म्हटलं आहे. ऑक्सिजनअभावी मृत्यू न झाल्याचं प्रतिज्ञापत्र खुद्द महाराष्ट्र सरकारनेच मुंबई उच्च न्यायालयात सादर केल्याचं संबित पात्रांनी म्हटलं आहे.

Read More