Marathi News> भारत
Advertisement

Helicopter Crash : बिपीन रावत यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या अपघाताची 'टाईमलाईन'

CDS बिपीन रावत यांच्या निधनाने संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला आहे

Helicopter Crash : बिपीन रावत यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या अपघाताची 'टाईमलाईन'

CDS Bipin Rawat Helicopter Crash :  तामिळनाडुमधल्या कुन्नूर इथं वायुसेनेच्या MI-17V5 हेलिकॉप्टर अपघातात देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) बिपीन रावत शहीद झाले. सीडीएस बिपीन रावत यांच्याबरोबर त्यांची पत्नी मधुलिका रावत आणि लष्कर अधिकारी असे एकूण 14 जण प्रवास करत होते. यापैकी तेरा जणांचा या अपघातात दुर्देवी मृत्यू झाला. 

तामिळनाडूत कुन्नूर इथं ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेनंतर स्थानिकांनी सर्वात आधी बचावकार्यासाठी धाव घेतली. अपघातग्रस्त झाडावर आदळून मोठा आवाज झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. देशाला हादरवणाऱ्या हा अपघात नेमका घडला कसा हे जाणून घेऊया.

अपघाताची टाईमलाईन
सीडीएस जनरल बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीसह नऊ जण बुधवारी सकाळी 9 वाजता विशेष विमानाने दिल्लीहून निघाले आणि सकाळी 11.35 च्या सुमारास एअरफोर्स स्टेशन सुलूर इथं दाखल झाले.

सकाळी 11:45 वाजता, दिल्लीतील 9 जण आणि पाच क्रू मेंबर्स म्हणजेच एकूण 14 लोक एअर फोर्स स्टेशन सुलूर इथून हेलिकॉप्टरने वेलिंग्टन आर्मी कॅम्पसाठी रवाना झालं.

दुपारी 12.20 च्या सुमारास नाचपा चतरम इथल्या कट्टारिया भागात हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं. हेलिकॉप्टर एअरफोर्स स्टेशन सुलूर इथून उड्डाण घेतल्यानंतर सुमारे 94 किमी प्रवास केल्यानंतर कट्टारिया परिसरात अपघात झाला.

अपघातस्थळ आणि ज्या ठिकाणी पोहाचायचं होतं ते वेलिंग्टन आर्मी कॅम्प यात फक्त 16 किमीचं अंतर होते. म्हणजेच वेलिंग्टन आर्मी कॅम्पच्या 16 किलोमीटर आधी जनरल रावत यांचं हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं. 

सीडीएस जनरल बिपिन रावत यांचं हेलिकॉप्टरने आणखी पाच मिनिटं उड्डाण केलं असतं तर ते त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचलं असतं. पण वाटेतच हेलिकॉप्टरचा अपघात झाला.

देशातील पहिले CDS 
जनरल बिपिन रावत हे देशातील पहिले सीडीएस होते. 31 डिसेंबर 2019 रोजी लष्करप्रमुख पदावरून निवृत्त झाल्यानंतर बिपिन रावत हे देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बनले. 31 डिसेंबर 2016 रोजी त्यांना लष्करप्रमुख बनवण्यात आलं. जनरल रावत यांना पूर्व सेक्टर, काश्मीर खोरे आणि ईशान्येकडील एलओसीमध्ये काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव होता. अशांत भागात काम करण्याचा अनुभव पाहता, दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्राधान्य देत मोदी सरकारने डिसेंबर 2016 मध्ये जनरल रावत यांना लष्करप्रमुख केलं होतं.

Read More