Marathi News> भारत
Advertisement

मृत सापाच्या पोस्टमार्टमनंतर तरुणाविरोधात गुन्हा दाखल; उत्तर प्रदेशमधील अजब घटना

गावातील रामशरण यांच्या घरात १२ फूट लांबीचा साप आढळून आला. हा साप सुवालीनच्या मदतीने त्यांनी घराबाहेर काढला. मात्र त्यानंतर जे घडलं त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओची दखल थेट वन विभागाने घेतली

मृत सापाच्या पोस्टमार्टमनंतर तरुणाविरोधात गुन्हा दाखल; उत्तर प्रदेशमधील अजब घटना

उत्तर प्रदेशमधील बागपत येथे एका तरुणाविरोधात साप मारल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वन विभागाने वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत असलेल्या कलमांनुसार या तरुणाविरोधात छपरोली पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेलेल्या सापाचं पोस्टमार्टम केल्यानंतर आरोपी तरुणाविरोधात दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस सध्या या तरुणाचा शोध घेत आहेत. बागपथमधील छपरौली पोलिस स्थानकाच्या हद्दीतील शबगा गावामध्ये एका १२ फूट लांबीच्या सापाला मारल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हायरल व्हिडीओच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार आरोपीचं नाव सुवालीन असं आहे. गावातील रामशरण यांच्या घरात १२ फूट लांबीचा साप आढळून आला. हा साप सुवालीनच्या मदतीने त्यांनी घराबाहेर काढला. मात्र त्यानंतर या सापाला जंगलात सोडून देण्याऐवजी सुवालीनने टोकदार काठीने सापाला ठेचून मारलं. त्यानंतर त्याने हा साप काठीवरुन संपूर्ण गावभर फिरवला. त्याच्या या कृत्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. वन विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी व्हायरल व्हिडीओची दखल घेत या तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी सुवालीनविरोधात वन्य जीव संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. वन विभागाने सापाचं पोस्टमार्टम केलं. या पोस्टमार्टम अहवालामध्ये काठी आणि टोकदार वस्तूंमुळे जखमा झाल्याने सापाचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं. याच अहवालाच्या आधारे वन विभागाने या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला.

वनरक्षक संजय यांनी दाखल केलेल्या लेखी तक्रारीनुसार छपरौली पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read More