Marathi News> भारत
Advertisement

प्रवाशांनी भरलेली बस कालव्यात पडल्याने मोठा अपघात, आतापर्यंत ३५ जणांचा मृत्यू

कालव्यात बस कोसळल्याने 35 जणांचा आतापर्यंत मृत्यू

प्रवाशांनी भरलेली बस कालव्यात पडल्याने मोठा अपघात, आतापर्यंत ३५ जणांचा मृत्यू

भोपाळ : मध्य प्रदेशात आज सकाळी मोठी दुर्घटना घडली. 54 प्रवाशांनी भरलेली बस सिधी येथे कालव्यात कोसळली. कालव्यातून आतापर्यंत सात जणांना बाहेर काढण्यात आलं आहे. ताज्या माहितीनुसार कालव्यात बुडल्यामुळे आतापर्यंत 35 जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. 35 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. बचावकार्य सातत्याने सुरू आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनीही सर्व बचावकार्यासाठी सूचना दिल्या आहेत.

छुहियाघाटी येथे हा अपघात झाला. बाणसागर प्रकल्पाचा हा कालवा असून त्यामध्ये बस कोसळली. कालव्यातून बाहेर काढलेल्या लोकांची अद्याप ओळख पटलेली नाही. उर्वरित प्रवाश्यांचा शोध सुरू आहे. एक पथक घटनास्थळी उपस्थित आहे, बचावकार्य सुरु आहे. जेव्हा हा अपघात झाला तेव्हा बस सतनाकडे जात होती. ड्रायव्हरने बसवरील नियंत्रण गमावल्यानंतर हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

अहवालानुसार कालवा इतका खोल आहे की बस त्यात पूर्णपणे बुडाली. बस क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. बाणसागर धरणातून येणारे पाणी बंद करण्यात आले आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी बस अपघाताबाबत जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा करुन माहिती घेतली आहे.

मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान म्हणाले की, कालवा बराच खोल आहे. आम्ही तातडीने धरणाचे पाणी थांबवले आणि मदत आणि बचाव पथके पाठविली. जिल्हाधिकारी, एसपी आणि एसडीआरएफची टीम तिथे पोहोचली आहे. बस काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री म्हणाले की, मदत आणि बचाव कार्य करणाऱ्या टीमशी मी सतत संपर्कात आहे. ७ लोकांचा जीव वाचवण्यात यश आलं आहे.

Read More