Marathi News> भारत
Advertisement

कर्नाटकात बॉयलरचा भीषण स्फोट; सहा जणांचा मृत्यू

साखर कारखान्याची वास्तू पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे.

कर्नाटकात बॉयलरचा भीषण स्फोट; सहा जणांचा मृत्यू

बंगळुरू: कर्नाटकमधील साखर कारखान्यात रविवारी बॉयलरचा स्फोट होऊन सहा जणांचा मृत्यू झाला. तर आणखी पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. येथील बागलकोट जिल्ह्यातील निरानी शुगर्स लिमिटेड साखर कारखान्यात ही दुर्घटना घडली. हा कारखाना भाजपचे माजी मंत्री असलेल्या मुरूगेश निरानी आणि त्यांचे भाऊ संगमेश व हनुमंत यांच्या मालकीचा आहे. बागलकोट तालुक्यात मोठ्या प्रमाणात उसाचं पिक घेतले जाते. उसाचे गाळप काढण्याचा काम सद्या सुरु असल्याने रविवारी अनेक मजूर कारखान्यात कामावर हजर होते. स्फोट झाल्यानंतर बॉयलरजवळ असलेल्या सहा कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला.

हा स्फोट इतका जोरदार होता की, साखर कारखान्याची वास्तू पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. तर लोखंडी साहित्यांची प्रचंड प्रमाणात पडझड झाली आहे. सध्या घटनास्थळी ढिगारा उपसण्याचे काम सुरु आहे. दरम्यान, या स्फोटाचे नेमके कारण अजून स्पष्ट होऊ शकलेले नाही. 

याच आठवड्यात शुक्रवारी कर्नाटक एका दुर्घटनेने हादरले होते. कर्नाटकच्या चामराजनगर जिल्ह्यात शुक्रवारी धार्मिक कार्यक्रमातील प्रसादातून झालेल्या विषबाधेत ११ जणांचा मृत्यू झाला होता. येथील सुलीवडी गावात या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रसाद सेवन केल्यानंतर अनेकांना उलट्या आणि पोटात दुखायला लागले. त्यामुळे या लोकांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान यापैकी ११ जणांचा मृत्यू झाला. 

या घटनेनंतर कर्नाटक सरकारने मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची आर्थिक मदत जाहीर केली. तर उर्वरित पीडितांच्या उपचाराचा खर्च सरकार उचलणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी केली होती.

Read More