Marathi News> भारत
Advertisement

'राज ठाकरे दबंग नेता नाही तर उंदीर' पाहा इतक्या वाईट शब्दात कोणी डिवचलं

राज ठाकरे यांच्यासमोर अयोध्या दौऱ्यापूर्वी मोठं आव्हान निर्माण होण्याची शक्यता 

'राज ठाकरे दबंग नेता नाही तर उंदीर' पाहा इतक्या वाईट शब्दात कोणी डिवचलं

गोंडा : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या अयोध्या (Ayodhya) दौऱ्यासाठी मनसेने जोरदार तयारी सुरु केली आहे. तर दुसरीकडे दौऱ्यावरुन राजकारणही तापलं आहे. राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला उत्तर प्रदेशमधले भाजप खासदार बृजभूषण सिंह (BJP MP Brujbhushan Singh) यांनी विरोध केला आहे. राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्यापूर्वी उत्तर भारतीयांची माफी मागावी अशी मागणी बृजभूषण सिंह यांनी केली आहे.

खासदार बृजभूषण सिंह यांनी आज पुन्हा एकदा राज ठाकरे यांना डिवचलं आहे. 'राज ठाकरे हिंदू नेता नहीं खलनायक है, कोई दबंग नेता नहीं, चुहा है चुहा,' अशा शब्दांत खासदार सिंह यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. 

बृजभूषण सिंह यांनी आज नंदिनी नगर परिसरातराज ठाकरे यांच्याविरोधात रॅली काढत शक्तीप्रदर्शनही केलं. महाराष्ट्रात उत्तर भारतीयांवर पुन्हा हल्ला झाल्यास आपण गप्प बसणार नाही. महाराष्ट्रात जाऊ असा, काँग्रेस सत्तेत असताना त्यांना सुरक्षा मिळत होती, पण आता मिळणार नाही, असं बृजभूषण यांनी म्हटलं आहे. 

राज ठाकरे यांनी माफी मागितली नाही तर यापुढे उत्तर प्रदेश, झारखंड आणि बिहारमध्ये येऊ इच्छित असतील तर उत्तर भारतीय त्यांचा विरोध करतील, या तिनही राज्यात ते येऊ शकणार नाहीत, असा इशाराही बृजभूषण यांनी दिला आहे. 

इतकंच नाही तर राज ठाकरे यांना विरोध करण्यासाठी बृजभूषण सिंह यांनी साधू आणि महंतांनाही आवाहन केलं आहे. मोर्चेबांधणी करण्यासाठी सिंह यांच्याकडून बैठकाही घेतल्या जात आहेत. 

राज ठाकरे यांनी परप्रांतीयांवर केलेल्या अन्यायाबाबत माफी मागितल्यास आम्ही त्यांचं अयोध्येत स्वागत करू, अशी भूमिका याआधी बृजभूषण सिंह यांनी घेतली आहे.

मनसे नेते आणि प्रवक्त्यांची बैठक
दरम्यान, मनसे नेते आणि प्रवक्ते यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सोबत शिवतीर्थवर बैठक झाली. बैठकीसाठी बाळा नांदगावकर, शिरीष सावंत, प्रकाश महाजन, गजानन काळे, योगेश चिले उपस्थित होते.  राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध होतोय या पार्श्वभूमीवर महत्वाची बैठक झाली.

Read More