Marathi News> भारत
Advertisement

कोरेगाव भीमा दंगलीत प्रकाश आंबेडकरांचा हात, भाजप खासदाराचा आरोप

 प्रकाश आंबेडकरांनी दंगल भडकवण्यास मदत केल्याचे खा. साबळे म्हणाले.

कोरेगाव भीमा दंगलीत प्रकाश आंबेडकरांचा हात, भाजप खासदाराचा आरोप

नवी दिल्ली :  कोरेगाव-भीमा येथे गेल्यावर्षी उसळलेल्या दंगलीत प्रकाश आंबेडकर यांचा हात असल्याचा आरोप राज्यातील एका भाजप खासदाराने केला आहे. दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात बुधवारी अमित शहा यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील भाजप खासदारांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. त्यावेळी एका खासदाराने कोरेगाव-भीमा दंगलीच्या मुद्द्यावरून भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर गंभीर आरोप केले. या दंगलीत प्रकाश आंबेडकर यांचा सहभाग स्पष्ट करणारे माओवाद्याचे पत्र आपल्याकडे आहे. प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या नातेवाईकांनी ही दंगल भडकवली. यासाठी त्यांनी माओवाद्यांची मदत घेतली, असा थेट आरोप या खासदारने केला. तसेच प्रकाश आंबेडकर यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी, अशी मागणीही या खासदाराने अमित शहा यांच्याकडे केली.

'कामाला लागा'

 'काहीही गमावून शिवसेनेशी युती केली जाणार नाही' असे स्पष्ट संकेत भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी दिले.'शिवसेना सोबत आहे का ? यावर स्पष्टता आली तर कामाला लागता येईल' असा प्रश्न एका खासदाराने उपस्थित केला. त्यावर 'काहीही गमावून शिवसेने सोबत युती केली जाणार नाही. शिवसेनेसोबत युती करण्यासंदर्भात भाजप सकारात्मक आहे परंतू भाजप काही गमावून युती करणारा नाही. तुम्ही सगळ्याच जागांवर कामाला लागा' असे अमित शहा यांनी उत्तर दिले. अमित शाह यांच्या वक्तव्यामुळे शिवसेनेच्या दबावापुढे भाजप झुकणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेनेच्या दबावापुढे भाजप झुकणार नसल्याचे अमित शाह यांनी भाजप खासदारांना सांगितले. सर्व खासदारांनी आपआपल्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन समस्या जाणून घ्याव्यात. २५ जानेवारी पूर्वी ही बैठक घ्यावी. २०१९ निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

भाजपचे कौतूक 

एरव्ही आपण भाजपचे सदस्य नसल्याचे सांगणारे खासदार संभाजी राजे यांनी अमित शाह यांच्या बैठकीला हजेरी लावली. संभाजी राजे यांनी महाराष्ट्र सदनातील मागील दरवाजाने बैठकीत प्रवेश केला. संभाजी राजे यांनी भाजप सरकारचे कौतूक केले. 'या सरकारने शिवाजी महाराजांसाठी जेवढे केले तेवढे कोणत्याच सरकारने केले नसल्याचेही' ते यावेळी म्हणाले. 

Read More