Marathi News> भारत
Advertisement

लष्करी कारकिर्दीतलं अत्युच्च शिखर गाठणारे लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे

भारताच्या लष्करप्रमुखपदी एक मराठी व्यक्ति विराजमान होणार आहेत. 

लष्करी कारकिर्दीतलं अत्युच्च शिखर गाठणारे लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे

पुणे : भारताच्या लष्करप्रमुखपदी एक मराठी व्यक्ति विराजमान होणार आहेत. भारताचे सध्याचे उपलष्करप्रमुख मनोज नरवणे आता भारताचे लष्करप्रमुख होणार आहेत. पुण्यात शिक्षण झालेले, एका मराठमोळ्या कुटुंबातले मनोज मुकुंद नरवणे यांनी आपल्या प्रचंड प्रयत्नांनी लष्करी कारकिर्दीतलं हे अत्युच्च शिखर गाठलंय. सध्याचे लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत हे ३१ डिसेंबर या दिवशी निवृत्त होत आहेत. 

त्यानंतर या मानाच्या पदावर लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे विराजमान होतील. लेफ्टनंट जनरल नरवणे यांनी आपल्या कारकिर्दीत असंख्य मोहिमा पाहिल्या आहेत. दहशतवाद विरोधी कारवायात ते तज्ज्ञ समजले जातात. परमविशिष्ट सेवा पदकाने ते या आधीच गौरवले गेलेत.

१ सप्टेंबर २०१९ पासून नरवणे हे लष्कराचे उपप्रमुख आहेत. त्याआधी १ ऑक्टोबर २०१८ पासून ते लष्कराच्या पूर्व विभागाचे प्रमुख होते. कारकिर्दीत परमविशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक, सेना पदक, विशिष्ट सेवा पदक या शौर्य पदकांनी त्यांचा सन्मान करण्यात आलाय. 

नरवणे यांनी ७ शीख लाईट इन्फन्ट्रीमधून लष्करी कारकिर्दीला सुरूवात केली. पुण्यात ज्ञानप्रबोधिनी या शाळेतून त्यांनी शालेय शिक्षण घेतलंय. त्यानंतर एनडीए आणि आयएमएमधून लष्करी प्रशिक्षण घेतलं आणि लष्करात ते रूजू झाले. 

याशिवाय चेन्नई विद्यापीठातून सामरिक शास्त्रात मास्टर्स पदवीही त्यांनी घेतली. त्याचबरोबर देवी अहिल्या विश्वविद्यालय, इंदूर इथून संरक्षण आणि व्यवस्थापन शास्त्रात एमफील पदवीही संपादन केलीय.

काश्मीर आणि उत्तरपूर्व राज्यात दहशतवाद विरोधी मोहिमांचा प्रचंड अनुभव नरवणे यांच्या गाठीशी आहे. जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रीय रायफल्सच्या बटालियनचं नेतृत्व त्यांनी केलंय. तसंच आसाम रायफल्समध्ये इन्स्पेक्टर जनरल म्हणूनही ते डेप्युटेशनवर होते.

Read More