Marathi News> भारत
Advertisement

सावधान! बर्ड फ्लूच्या फैलावामुळं माराव्या लागल्या 5000 कोंबड्या; धोका वाढला

H5N1 Latest Updates : मंकीपॉक्स, कोरोनाची दहशत संपत नाही तोच पुन्हा एकदा बर्ड फ्लूनंही डोकं वर काढल्यामुळं या विषाणूजन्य आजारांनी अडचणींमध्ये भर टाकली आहे. 

सावधान! बर्ड फ्लूच्या फैलावामुळं माराव्या लागल्या 5000 कोंबड्या; धोका वाढला

H5N1 Latest Updates : कोरोनानं देशातून काढता पाय घेतला असतानाच  मंकीपॉक्सनं भीती वाढवली आणि पुन्हा एकदा या आजारांचं सावट संपूर्ण जगासह भारतावरही पाहायला मिळालं. इथं या दोन आजारांची दहशत कमी होत नाही, तोच आता बर्ड फ्लूनंही पुन्हा एकदा देशात हातपाय पसरले असून, या संसर्गाचं सर्वाधिक संकट पाहता या कारणास्तव तब्बल 5000 कोंबड्या मारल्याचीही घटना समोर आली आहे. 

ओडिशामध्ये बर्ड फ्लूचं हे संकट आणखी बळावलं असून, पिपिली येथील एका पोल्ट्री फार्ममध्ये एकाच वेळी अनेक कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येताच राज्य शासनाच्या वतीनं तातडीनं एक पशुवैद्यकिय पथक घटनास्थळी पाठवत तेथून काही नमुने चाचणीसाठी पाठवले. सदर चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यामुळं शनिवारपासूनच या पोल्ट्री फार्मसह या भागातील इतरही कोंबड्या मारण्याचं काम यंत्रणांनी हाती घेतलं. 

हेसुद्धा वाचा : लहान मुलांमध्ये मंकीपॉक्सचा धोका अधिक, 'ही' 10 लक्षणे वेळीच ओळखा

 

साथरोग नियंत्रक मंडळाचे महासंचालक जगन्नाथ नंदा यांच्या माहितीनुसार शनिवारी इथं 300 कोंबड्या मारण्यात आल्या, तर रविवारी 4700 कोंबड्या मारल्या गेल्या. येत्या काळात पिपिली येथे 20000 कोंबड्या/ पक्षी मारले जाणार असून, संसर्गाचा धोका आणखी वाढू नये यासाठीच हा निर्णय घेतला गेला आहे. 

दरम्यान, सदर पोल्ट्री फार्म आणि तिथपासून 1 किमी अंतरामधील जे जे पक्षी या फोफावत्या संसर्गामुळं मारले जाणार आहेत त्यांचं पालन करणाऱ्यांना राज्य शासनाच्या वतीनं आर्थिक मोबदला दिला जाणार आहे. बर्ड फ्लू हा एक संसर्ग असून, पक्षांमध्ये आणि दुर्मिळ प्रसंगी तो मानवामध्ये संक्रमित होतो. एखाद्या व्यक्तीला बर्ड फ्लूची लागण झाल्यास त्यांच्यामध्ये ताप, खोकला, घसा खवखवमं, मांसपेशींमध्ये वेदना, हलकी डोकेदुखी अशी लक्षणं जाणवू शकतात. गंभीर स्तरावरील संसर्गामध्ये न्यूमोनिया, श्वसनात अडचणी अशीही संकटं ओढावतात. 

बर्ड फ्लूपासून बचाव करण्यासाठी तज्ज्ञ पोल्ट्री किंवा पोल्ट्री उत्पादनं स्वच्छतेचे निकष पाळूनच वापरात आणण्याचा सल्ला देतात. याशिवाय अशा उत्पादनांच्या वापरानंतर हात स्वच्छ धुण्याचा सल्ला देतात. 

Read More