Marathi News> भारत
Advertisement

अरविंद केजरीवाल यांच्या विजयाची हॅटट्रिक, विजयाचे श्रेय कशात?

 आम आदमी पार्टीचा दिल्लीत पुन्हा एकदा मोठा विजय झाला. 

अरविंद केजरीवाल यांच्या विजयाची हॅटट्रिक, विजयाचे श्रेय कशात?

नवी दिल्ली : आम आदमी पार्टीचा दिल्लीत पुन्हा एकदा मोठा विजय झाला. केजरीवाल नावाच्या एका साध्या माणसाने दिल्ली विजयाची हॅटट्रिक केली. हिरो ऑफ द डे- अर्थातच अरविंद केजरीवाल. अरविंद गोविंदराम केजरीवाल. हे काय विजय दीनानाथ चौहानसारखं भारदस्त नाव नाही.  अगदी साधं नाव. पण साधेपणात काय ताकद असते, हे केजरीवालांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं.  नेहमी पँट आणि बुशशर्ट, फार तर एखादा मफलर, या चौकटीबाहेर केजरीवाल कधीच पडले नाहीत. २०१२ मध्ये  भ्रष्टाचाराचा सफाया करण्यासाठी केजरीवाल झाडू घेऊन मैदानात उतरले.. आज ते दिल्लीचे सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होत आहेत. विकासाच्या अतिशय साध्या सोप्या सरळ मॉडेलचे नाव केजरीवाल. 

केजरीवाल यांना का यश मिळाले?

भाजपने २१ वर्षानंतर दिल्ली काबीज करण्यासाठी विडा उचला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीचा पाणी प्रश्नाचा विषय लावून धरला होता. तसेच अधिक विकासासाठी भाजपला मदत करण्याचे आवाहन केले होते. तसेच पाकिस्तानचा मुद्दा, कलम ३७०, सीएए, एनआरसी यासारखे मुद्दे प्रचारात आणले होते. केजरीवाल हे दहशतवादी आहेत, असा भाजपकडून प्रचार केला गेला. धार्मिकतेचा पुढे आणला गेला. मात्र, केजरीवाल यांनी कोणावर टीका न करता विकासाचा मुद्दा उचलून तोच प्रचाराचा मुख्य विषय ठेवला. तसेच केलेल्या विकासकामांवर मत देण्याची मागणी केली. मी तुमचा मुलगा आहे, मला विकास करण्याची पुन्हा संधी द्या, मी दिल्लीला अधिक चांगले शहर बनविण्यासाठी मेहनत घेईन आदी मुद्दे प्रचारात आणले. त्याचा फायदा हा केजरीवाल यांना दिसतोय.

१. केजरीवालांनी फक्त आणि फक्त विकासावर लक्ष केंद्रित केलो

२. धर्म किंवा धर्मांमधली फूट नव्हे तर विज्ञानच देशाला पुढे नेईल, याचा पुनरुच्चार केजरीवालांनी प्रचारात अनेक वेळा केला 

३. विजयाचा मार्ग फ्रीबीजमधून जातो, हे केजरीवाल जाणून होते...म्हणूनच दिल्लीत बस, मेट्रोमध्ये महिलांना सवलती सुरू केल्या. 

४. भाजप खासदार प्ररवेश वर्मा यांनी केजरीवालांचा दहशतवादी म्हणून उल्लेख केला 

५. त्याला प्रत्यक्ष उत्तर देणं केजरीवालांनी टाळलं 

६. पण त्याचवेळी आपण हिंदूच आहोत, हा मेसेज मुलीकरवी दिला 

७. भाजपनं दिल्लीत नेत्यांची फौज उतरवली असताना केजरीवालांनी घरोघरी प्रचारावर भर दिला 

८. भाजपने त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा नेता जाहीर करावा, याचं वारंवार आव्हान देत प्रतिस्पर्ध्याकडे नेता नाही, हेही केजरीवाल वारंवार दिल्लीकरांना दाखवून देत होते 

९. दिल्लीत आंदोलनं पेटली असताना केजरीवालांनी त्यावर भाष्य करणं किंवा त्याला महत्त्व देणं कटाक्षानं टाळलं 

१०. दिल्लीत ध्रुवीकरणाचे वारे असताना त्याचा कुठलाही परिणाम झाला नाही 

११. दिल्लीत आंदोलना दरम्यान गोळीबार करणारा आपचा कार्यकर्ता असेल, तर कठोर शासन केलं जाईल, अशी रोखठोक भूमिका केजरीवालांनी घेतली

१२. दिल्लीत कितीही आंदोलनं सुरू राहू देत, केजरीवालांनी  विकासाचा अजेंडा ढळू दिला नाही 

१३. कुमार विश्वास आणि योगेंद्र यादवसारख्या बऱ्याच नेत्यांनी साथ सोडूनही केजरीवाल  जराही विचलित झाले नाहीत    

१४. हे सरकार 'आप'का सरकार अर्थात लोकांचं सरकार असल्याचं, केजरीवालांनी दिल्लीकरांच्या मनात बिंबवले. 

१५. साधेपणा हाच केजरीवालांचा कायम यूएसपी राहिला, त्यामुळे दिल्लीकरांचा विश्वास कायम त्यांच्याबरोबर राहिला  

१६. जेन्युईन अर्थात प्रामाणिक आण सच्चा ही प्रतिमा केजरीवालांनी पहिल्यापासून जपली.... आणि अखेर दिल्लीच्या दिग्विजयानं हॅटट्रिक साधली आणि अखेर दिल्लीत फिर एक बार, आप सरकार.

Read More