Marathi News> भारत
Advertisement

'भारताच्या विकासात आमचं...'; हिंडनबर्ग प्रकरणात SC च्या दिलाशानंतर गौतम अदानींची पहिली प्रतिक्रिया

Adani Hindenburg Case Gautam Adani React: हिंडनबर्ग प्रकरणामध्ये अदानी समुहाची जी चौकशी सुरु आहे ती 'सेबी'कडून काढून एसआयटीला सोपवण्यात यावी अशी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेली.

'भारताच्या विकासात आमचं...'; हिंडनबर्ग प्रकरणात SC च्या दिलाशानंतर गौतम अदानींची पहिली प्रतिक्रिया

Adani Hindenburg Case Gautam Adani React: हिंडनबर्ग-अदानी प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा निर्णय देत अदानी समुहाला मोठा दिलासा दिल्यानंतर अदानी समुहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी यांनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. सुप्रीम कोर्टाने हिंडनबर्ग-अदानी प्रकरणाचा तपास विशेष तपास समितीकडे म्हणजेच एसआयटीकडे देण्यास नकार दिला आहे. या प्रकरणाचा तपास भांडवली बाजार नियामक 'सेबी'च करेल असं कोर्टाने स्पष्ट केलं आहे. या निलाकानंतर गौतम अदानींनी मोजक्या शब्दांमध्ये आपली पहिली प्रतिक्रिया नोंदवताना भारताच्या प्रगतीमध्ये अदानी समुहाचं योगदान असल्याचं म्हटलं आहे.

अदानींना दिलासा देत कोर्टाने काय म्हटलं?

हिंडनबर्ग प्रकरणामध्ये अदानी समुहाची जी चौकशी सुरु आहे ती 'सेबी'कडून काढून एसआयटीला सोपवण्यात यावी अशी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. या प्रकरणामध्ये सुनावणी पूर्ण होऊन सुप्रीम कोर्टाने 24 नोव्हेंबर रोजी आपला निकाल राखून ठेवला होता. आज हा निकाल जाहीर करताना कोर्टाने अदानी समुहावर हिंडनबर्ग प्रकरणात करण्यात आलेले आरोप हे भांडवली बाजार नियामक 'सेबी'च्या अधिकार क्षेत्रात येतात. सेबीच्या प्रकरणामध्ये दखल देण्याचा मर्यादित अधिकार कोर्टाला आहे, असं म्हणत हस्तक्षेप करण्यास नकार दिला. सरन्यायाधीश डी. व्हाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती जे. बी. परदीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठाने आपला निकाल देताना, सेबीच्या तपासामध्ये कोर्ट हस्तेक्षप करणार नाही, असं स्पष्ट केलं आहे.

कोर्टाने 'सेबी'ला दिला 3 महिन्यांचा वेळ

सुप्रीम कोर्टाने 'सेबी'ला इतर 2 प्रकरणांमध्ये तपासासाठी 3 महिन्यांचा वेळ दिला आहे. अदानी-हिंडनबर्ग वादासंदर्भातील वेगवेगळ्या याचिकांवर सरन्यायाधीश डी. व्हाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षेतेखालील खंडपीठाने 24 नोव्हेंबर रोजी आपला निकाल राखून ठेवला होता. सुप्रीम कोर्टाने 'सेबी'कडून केला जात असलेला तपास योग्य दिशेन सुरु आहे असं म्हटलं आहे. सेबीने 24 पैकी 22 प्रकरणांचा तपास केला आहे. उरलेल्या 2 प्रकरणांचा तपासही 3 महिन्यांमध्ये पूर्ण करुन अहवाल सादर करण्याचा आदेश कोर्टाने 'सेबी'ला दिला आहे. सेबी ही सक्षम संस्था आहे. ओसीसीपीआरच्या अहवालाच्या आधारावर 'सेबी'च्या तपासावर संक्षय घेता येणार नाही. तसेच 'सेबी'कडून हा तपास एसआयटीकडे सोपवण्याची मागणीही कोर्टाने फेटाळली आहे. 

निकालानंतर गौतम अदानी नेमकं काय म्हणाले?

या निकालानंतर गौतम अदानींनी काही तासांमध्ये आपल्या एक्स (आधीचं ट्वीटर) अकाऊंटवरुन आपली प्रतिक्रिया नोंदवली. 'माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरुन सत्य काम जिंकते असं दिसून आलं आहे. सत्यमेव जयते. आमच्यासोबत जे उभे राहिले त्यांचा मी आभारी आहे. भारताच्या विकासात आमचं योगदान यापुढेही कायम राहणार आहे. जय हिंद,' असं गौतम अदानींनी म्हटलं आहे.

गुंतवणूकदारांचं हित लक्षात घेत...

हिंडनबर्ग-अदानी प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने आपल्या निकालात 'सेबी'च या प्रकरणाचा तपास करेल असं म्हटलं आहे. एसआयटीकडे हा तपास सोपवला जाणार नाही. 'सेबी' हा तपास करण्यासाठी सक्षण आहे. त्यामुळे या प्रकरणात हस्तेक्षप करण्याची गरज आहे असं आम्हाला वाटत नाही. तसेच सुप्रीम कोर्टाने भारत सरकार आणि 'सेबी'ला गुंतवणूकदारांचं हित लक्षात घेत अधिक सुरक्षित व्यवहारांसाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. कोर्टाने 'सेबी'ला सध्या असलेलं नियमनाचं तंत्र अधिक सुधारण्याचं आणि तज्ज्ञांची समिती निर्माण करण्याचे निर्देश दिलेत.

मीडियामधील बातम्यांवरुन निष्कर्ष नको

इतकेच नाही तर या तज्ज्ञांच्या समितीमधील सदस्यांसंदर्भात उपस्थित करण्यात आलेले प्रश्न कोर्टाने फेटाळून लावले आहेत. हितसंबंधांचा संदर्भ देत करण्यात आलेले आरोप हे चुकीचे असल्याचं म्हटलं आहे. कोणत्याही ठोस दाव्यांशिवाय 'सेबी'कडून हा तपास काढून घेणं योग्य नाही असं म्हटलं आहे. प्रसारमाध्यमांमधील बातम्यांच्या आधारे 'सेबी'संदर्भात निष्कर्ष काढणं योग्य नाही, असं म्हणत कोर्टाने अदानी समुहाला मोठा दिलासा दिला. 

Read More