Marathi News> भारत
Advertisement

किन्नौर दुर्घटना! 'पहिल्यांदाच एकटी प्रवासाला निघाली, पण आयुष्यातला ठरला शेवटचा प्रवास'

दीपा शर्मा यांनी 'केबीसी'मध्ये सहभाग घेत लाखो रुपये जिंकले होते, दीपाचा मृत्यू अनेकांच्या मनाला चटका लावून गेलाय.

किन्नौर दुर्घटना! 'पहिल्यांदाच एकटी प्रवासाला निघाली, पण आयुष्यातला ठरला शेवटचा प्रवास'

मुंबई : हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यात भूस्खलनामुळे झालेल्या दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला. सांगला-छितकुल रस्त्यावरील बटसेरी भागात ही घटना घडली. या दुर्घटनेत आयुर्वेद डॉक्टर दीपा शर्मा यांचाही दुर्देवी मृत्यू झाला. दीपाने 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. तसंच शाहिन बाग इथं करण्यात आलेल्या आंदोलनातही भाग घेतला होता. 

दीपा यांनी कौन बनेगा करोडपतीच्या 7 व्या सिझनमध्ये 2013 साली सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये, 6 लाख 40 हजार रुपयेही जिंकले होते. या कार्यक्रमाशी संबंधीत अनेक फोटो दीपाने सोशल मीडियावर शेअर केले होते. 

दीपा शर्मा या सोशल मीडियावर चांगल्याच चर्चेत होत्या. दिपा शर्मा पहिल्यांदाच हिमालयात एकट्या फिरायला गेल्या होत्या. आपल्या पर्यटनाचे फोटो त्या सोशल मीडियावर अपडेट करत होत्या. पण त्यांच्या आयुष्यातील हा शेवटचा प्रवास ठरला. अवघ्या 34 व्या वर्षी दीपाचा मृत्यू अनेकांच्या मनाला चटका लावून गेलाय.

या दुर्घटनेनंतर त्यांची सोशल मीडियावरची शेवटची पोस्टही अनेकांचं मन हेलावून गेलीय. ट्विटवर केलेल्या पोस्टमध्ये फोटो शेअर करत तीने म्हटलं होतं,  ‘मी सध्या भारताच्या शेवटच्या टप्प्यावर उभी आहे, त्यापलीकडे नागरिकांना जाण्याची परवानगी नाही. या ठिकाणाहून सुमारे 80 किलोमीटर अंतरावर तिबेटची सीमा असून ती चीननं बेकायदेशीरपणं ताब्यात घेतली आहे.’ 

रविवारी दुपारी किन्नौर जिल्ह्यातील बटेसरी भागात छितकुलाहून सांगलाच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हरलवर दरड कोसळल्यानं या गाडीतून प्रवास करणाऱ्या चालकासहीत नऊ पर्यटकांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शोक व्यक्त केला.

 

Read More