Marathi News> भारत
Advertisement

दिवाळीत चिनी वस्तूंवर भारतीयांचा बहिष्कार; विक्रीत ६० टक्क्यांची घट

यंदा चिनी वस्तूंची विक्री कमी झाल्याचं सांगण्यात येत आहे.

दिवाळीत चिनी वस्तूंवर भारतीयांचा बहिष्कार; विक्रीत ६० टक्क्यांची घट

नवी दिल्ली : सोशल मीडियावर अनेकांकडून चायनीज वस्तू न वापरण्याचे आवाहन करण्यात येतं. जवळपास गेल्या तीन वर्षांपासून चायनीज वस्तूंवर बहिष्कार टाकण्याबाबतची मोहिम सुरु आहे. मात्र यंदा या मोहिमेचा काहीसा परिणाम झाल्याचं चित्र समोर आलं आहे. दिवाळीवेळी चिनी वस्तूंची मोठ्या प्रमाणात विक्री होताना दिसते. पण यंदा चिनी वस्तूंची विक्री कमी झाल्याचं समोर आलं आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी चिनी वस्तूंच्या विक्रीत जवळपास ६० टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे.

नुकत्याच झालेल्या दिवाळीवेळी, देशातील २१ शहरांमध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार, चिनी उत्पादनांच्या विक्रीत ६० टक्के घट झाल्याचा आकडा 'कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स' (CAIT) कडून प्रसिद्ध करण्यात आला आहे. 

दिवाळी २०१८ मध्ये जवळपास ८ हजार कोटी रुपयांच्या चिनी वस्तू विकल्या गेल्याचा अंदाज आहे. तर यंदाच्या २०१९च्या दिवाळीत जवळपास ३२०० कोटी रुपयांच्या चिनी वस्तू विकल्या गेल्याचं बोललं जात आहे.

'कॅट'चे ​​सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितलं की, यावर्षी आम्ही देशभरातील व्यापारी आणि आयातदारांना दिवाळीत चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचा सल्ला दिला होता. त्याप्रमाणे आयातदारांनीही चीनमधून अतिशय कमी प्रमाणात चिनी वस्तू आयात केल्या. दुसरीकडे व्यापाऱ्यांनीही देशी सामान खरेदी करण्यावर अधिक भर दिला होता. त्यामुळेच यावर्षी दिवाळी दरम्यान चिनी उत्पादनांची उपलब्धता अत्यंत कमी झाली असल्याचं ते म्हणाले.

'कॅट'च्या सर्वेक्षणानुसार, भेटवस्तू, इलेक्ट्रिक गॅजेट्स, फॅन्सी लाइट्स, भांडी आणि स्वयंपाक घरातील उपकरणं, प्लॅस्टिक वस्तू, देवी-देवतांच्या मूर्ती, घर सजावटीचं सामान, खेळणी, लॅम्प, वॉल हँगिंग, होम फर्निशिंग वस्तू यांसारख्या चिनी वस्तूंच्या विक्रीत मोठी घट झाल्याचं समोर आलं आहे.

सर्वेक्षणादरम्यान, जवळपास ८५ टक्के व्यापाऱ्यांनी दिवाळी दरम्यान चिनी उत्पादनांच्या किंमतीत घट झाल्याचं सांगितलं. तर इतर १५ टक्के व्यापारांनी भारतात अद्यापही चिनी वस्तूंचा बाजार असल्याचं म्हटलं आहे. 

  

हे सर्वेक्षण २४ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबरदरम्यान करण्यात आलं होतं. देशातील प्रमुख २१ शहरांत सर्वेक्षण करण्यात आलं होतं. दिल्ली, मुंबई, चेन्नई, बंगळुरु, हैदराबाद, रायपूर, नागपूर, पुणे, भोपाळ, जयपूर, लखनऊ, कानपूर, अहमदाबाद, रांची, डेहराडून, जम्मू, कोइंम्बतूर, भुवनेश्वर, कोलकाता, पदुच्चेरी आणि तिनसुकिया या शहरांत सर्वेक्षण करण्यात आलं होतं.

Read More