Marathi News> भारत
Advertisement

बलात्कार प्रकरणी चारही क्रूरकर्म्यांना फाशी, अखेर निर्भयाला न्याय

आठ वर्षांनी मिळाला न्याय 

बलात्कार प्रकरणी चारही क्रूरकर्म्यांना फाशी, अखेर निर्भयाला न्याय

नवी दिल्ली :  २०१२ मध्ये घडलेल्या दिल्ली गँगरेप प्रकरणातील पीडिता 'निर्भया' ला तब्बल आठ वर्षांनी न्याय मिळाला आहे. क्रूरकर्म केलेल्या चारही दोषींना सकाळी साडे पाच वाजता फाशी देण्यात आली. निर्भयासाठी रस्त्यावर उतरलेल्या त्या प्रकारासाठी ही बातमी अत्यंत महत्वाची आहे. निर्भया बलात्कार प्रकरणातील चारही दोषींना फाशी देण्यात आली. इतिहासात पहिल्यांदा असं झालं की चारही दोषींना एकत्र फाशी देण्यात आली. 

सकाळी चार वाजता दोषींना आंघोळ घालून नवीन कपडे देण्यात आले. या चारही दोषींना जल्लाद पवनकडून फाशी देण्यात आली. एकूण सात वर्षे तीन महिने आणि तीन दिवसांनी या दोषींना मृत्यूदंडांची शिक्षा मिळाली. एवढ्या वर्षात या दोषींनी पळ काढण्याचे अनेक मार्ग अवलंबले पण अखेर त्यांना आज फाशी झाली आहे. आजचा दिवस हा 'न्याय दिवस' म्हणून घोषित करावा अशी प्रतिक्रिया समाजातून उमटत आहे. 

निर्भया बलात्कार प्रकरणातल्या चौघाही दोषींची फाशी टाळण्यासाठी त्यांच्या वकिलांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले पण ते अयशस्वी ठरले. रात्री हायकोर्टानं याचिका फेटाळल्यानंतर सर्वात शेवटचा प्रयत्न म्हणून दोषींचे वकील ए पी सिंग यांनी मध्य रात्रीनंतर अडीच वाजता सुप्रीम कोर्टात पुन्हा एकदा दाद मागितली. मात्र सर्व प्रयत्न अपयशी ठरले.

जस्टिस आर भानुमती, जस्टिस अशओक भूषण आणि जस्टिस ए एस बोपन्ना यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी झाली. तर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरकारतर्फे युक्तीवाद केला. यावेळी चौघांपैकी एक दोषी पवन याच्या वयाचा मुद्दा सिंग यांनी सुप्रीम कोर्टात मांडला. त्यावर आक्षेप घेत, कनिष्ठ न्यायालय, दिल्ली हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टानेही या आधी अल्पवयीन असल्याचा मुद्दा नाकारल्याचं खंडपीठानं सांगितलं. तसंच या पूर्वी झालेल्या सुनावणीतलेच मुद्दे आताही मांडले जात असल्याकडेही खंडपीठानं दोषींचे वकील ए पी सिंग यांचं लक्ष वेधलं.

चौघा दोषींचा दयेचा अर्ज राष्ट्रपतींनी फेटाळला आहे, त्याला तुम्ही कशाच्या आधारावर आव्हान देत आहात असा थेट प्रश्न यावेळी खंडपीठानं विचारला. आणि ही याचिका निकाली काढली. त्याबरोबरच दोषींची फाशी टाळण्याचा त्यांच्या वकिलांचा अखेरचाही प्रयत्न फोल ठरला. आणि फाशीचा मार्ग मोकळा झाला.

Read More