Marathi News> हेल्थ
Advertisement

अशाप्रकारे घरच्या घरी बनवा होळीचे नैसर्गिक रंग!

होळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे.

अशाप्रकारे घरच्या घरी बनवा होळीचे नैसर्गिक रंग!

मुंबई : होळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. होळी नंतर येणाऱ्या रंगपंचमीत रंगांची उधळण होते. त्यात बाजारात मिळणारे केमिकल्सयुक्त रंग वापरले जातात. पण त्यामुळे त्वचेचे, केसांचे नुकसान होऊ शकते. सण हे आनंद लुटण्यासाठी असतात. स्वतःला किंवा दुसऱ्याला त्रास देण्यासाठी नाही. म्हणून यंदाच्या होळीला रंगा नैसर्गिक रंगात.... हे रंग तुम्ही घरच्याघरीही बनवू शकता. पहा कसे बनवायचे हे नैसर्गिक रंग...

लाल रंग

गुलाबाच्या पाकळ्यांच्या मदतीने तुम्ही घरच्या घरी लाल रंग बनवू शकता. गुलाबाच्या पाकळ्या वाटून ते मिश्रण गहु किंवा तांदळाच्या पिठात मिसळा. या रंगाला छानसा सुगंधही येईल. तसंच लाल रंग बनवण्यासाठी बिटाचाही वापर करू शकता. बीट कापून घ्या. मग त्याचा रस काढा आणि पीठ किंवा मैद्यात मिसळा. सुंदरसा लाल रंग घरच्या घरी तयार होईल.

हिरवा रंग

पालक किंवा मेथीपासून तुम्ही अगदी सहज हिरवा रंग बनवू शकता. पालक किंवा मेथी उकळवून त्याची पेस्ट बनवा. नंतर सुकवा आणि वाटून घ्या. ही पावडर आरारूट किंवा तांदळाच्या पिठात मिसळा. सुगंधासाठी त्यात चंदन पावडर मिसळा.

पिवळा किंवा नारंगी रंग

हळदीपेक्षा पिवळे काय आहे? त्याचबरोबर हळद त्वचेसाठीही उत्तम असते. त्यापासून कोणतेही साईड इफेक्ट होण्याची भीती नसते. तसंच पिवळा रंग बनवण्यासाठी तुम्ही झेंडूची फुले वापरू शकता.

चॉकलेटी रंग 

चॉकलेटी रंग बनवण्यासाठी  ‘कात’ वापरु शकता. ज्याचा वापर प्रामुख्याने खायच्या पानांत केला जातो. चहा किंवा कॉफी उकळून ती गाळून थंड करुन  त्याचे पाणी तुम्ही  वापरू  शकता.

Read More