Marathi News> हेल्थ
Advertisement

काहींचे डोळे तपकिरी तर काहींचे निळे का असतात? डोळ्याच्या रंगामागचे संपूर्ण सायन्स समजून घ्या

काही लोकांचे डोळे हे तपकिरी, तर काहींचे डोळे गडद काळ्या रंगाचे असतात. याशिवाय असे ही क्वचित लोक आहेत. ज्यांच्या डोळ्यांचा रंग हा हिरवा राखाडी आणि निळा देखील असतो. 

काहींचे डोळे तपकिरी तर काहींचे निळे का असतात? डोळ्याच्या रंगामागचे संपूर्ण सायन्स समजून घ्या
Updated: Aug 12, 2022, 10:11 PM IST

मुंबई : आपण जेव्हाही एखाद्या नवीन व्यक्तीला भेटतो, तेव्हा आपण त्याचा चेहरा नीट पाहातो, जेणेकरुन आपल्याला त्याचा चेहरा लक्षात राहिल. एवढेच काय तर आपण कोणाशीही बोलताना त्याच्या तोंडाकडे पाहून बोलतो आणि शक्यतो आय कॉन्टॅक्ट म्हणजेच डोळ्यांकडे पाहून बोलतो. तेसे पाहाता ही एक सामान्य प्रक्रिया आहे. अशा परिस्थितीत, तुमच्या लक्षात आले असेल की बहुतेक लोकांच्या डोळ्यांचा रंग हा वेगळा असतो.

काही लोकांचे डोळे हे तपकिरी, तर काहींचे डोळे गडद काळ्या रंगाचे असतात. याशिवाय असे ही क्वचित लोक आहेत. ज्यांच्या डोळ्यांचा रंग हा हिरवा राखाडी आणि निळा देखील असतो. अशा लोकांकडे पाहाताना आपल्याला काही क्षणांसाठी थोडं वेगळं वाटतं, पण काही काळानंतर हे सामान्य वाटू लागतं.

पण असं का होतं? असा प्रश्न अनेकांना पडला असणार, चला जाणून घेऊ या.

निळे डोळे ऐश्वर्या रायचेही आहेत आणि सैफ-करिनाचा मुलगा तैमूरचेही आहेत. वास्तविक, डोळ्यांच्या या रंगांचा संबंध त्या व्यक्तीच्या डीएनएशी असतो. यामागील शास्त्र काय आहे ते जाणून घेऊया.

तज्ज्ञांच्या मते, डोळ्यांचा रंग हा बुबुळाच्या मेलॅनिनच्या प्रमाणावरून ठरतो. यासोबतच प्रथिनांची घनता आणि सभोवतालच्या प्रकाशाचाही बुबुळांच्या रंगावर परिणाम होतो. डोळ्याचा रंग 9 श्रेणींमध्ये विभागलेला आहे आणि डोळ्याच्या रंगाशी संबंधित अशा 16 जीन्स आहेत.

जे दोन प्रमुख जीन्स डोळ्याच्या रंगासाठी जबाबदार असतात, ते OCA2 आणि HERC2 आहेत आणि दोघांचेही क्रोमोझोम्स 15 मध्ये असतात. HERPC2 जीन्स हे OCA2 च्या अभिव्यक्तीवर नियंत्रण ठेवते आणि HERC2 काही प्रमाणात निळ्या डोळ्यांसाठी जबाबदार आहे. त्याच वेळी, OCA2 काही प्रमाणात निळ्या आणि हिरव्या डोळ्यांशी संबंधित आहे.

बहुतेक लोकांचे डोळे तपकिरी असतात. कारण त्याचं समिकरण विकसित करणारी जीन्स आणि क्रोमोझोम्स बहुतेक लोकांमध्ये असतात. असेही मानले जाते की, निळे डोळे असलेल्या लोकांची संख्या जगात सर्वात कमी आहे. असेही म्हटले जाते की, निळ्या डोळ्यांच्या लोकांचे पूर्वज एकच आहेत. यामध्ये असं ही मानलं जातं की सुमारे 6 हजार ते 10 हजार वर्षांपूर्वी मानवी जीन्समध्ये बदल झाला होता, ज्यामुळे लोकांच्या डोळ्यांचा रंग निळा होऊ लागला होता.

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)