Marathi News> मनोरंजन
Advertisement

ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंनी केली डोळ्यांची शस्त्रक्रिया, मराठी अभिनेत्याच्या पोस्टमधून उघड झाली माहिती

एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने डॉ. तात्याराव लहाने यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया केल्याचे सांगितले. 

ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंनी केली डोळ्यांची शस्त्रक्रिया, मराठी अभिनेत्याच्या पोस्टमधून उघड झाली माहिती

Milind Gawali Meet Dr Tatyarao Lahane : गेली अनेक वर्षे अंधांना दृष्टी देण्यासाठी झगडत असलेले ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ म्हणून डॉ. तात्याराव लहाने यांना ओळखले जाते. त्यांनी आतापर्यंत एक लाखाहून अधिक मोतिबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. यासाठी डॉ. लहाने यांच्या नावाची नोंद जागतिक विक्रमासाठीही करण्यात आली आहे. डॉ. तात्याराव लहान यांनी २००८ मध्ये तत्कालीन राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते. आता एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने डॉ. तात्याराव लहाने यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया केल्याची माहिती समोर आली आहे. याबद्दल त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. 

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील कलाकारांचे लाखो चाहते आहेत. या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता म्हणून मिलिंद गवळींना ओळखले जाते. ते या मालिकेत अनिरुद्ध देशमुख ही व्यक्तिरेखा साकारताना दिसतात. नुकतंच मिलिंद गवळी यांनी डॉ. तात्याराव लहाने यांची भेट घेतली. याबरोबरच त्यांनी एक किस्साही सांगितला. 

मिलिंद गवळींनी केला खुलासा

“डॉक्टर तात्यारावसाहेब लहाने” काल अचानक डॉक्टर तात्यारावसाहेब लहाने यांची भेट प्रभादेवीला सागर पगार यांच्या लोकल बंधन च्या स्टुडिओमध्ये झाली. ऋतुजा देशमुख माझी माझी मुलाखत घेत होत्या. डॉ. तात्याराव लहानेंना भेटून खरंच फार मस्त वाटलं. मी त्यांना बघता क्षणी त्यांच्या पाया पडलो, तर त्यांनी मला खांद्याला धरून वर उचलून घेतले,मला म्हणाले पाया पडू नकोस, अरे घट्ट मिठी मार, त्यांच्याशी बोलत असताना त्यांना एक फोन आला, त्यांनी फोन उचलला आणि म्हणाले “हा बोल अशा चष्मा मिळाला ना तुला ,आता व्यवस्थित दिसतंय ना तुला काही त्रास नाही ना” “ हे बघ इथे माझ्याबरोबर कलाकार मिलिंद गवळी आहे”

मग मी पण आशाबाई भोसले यांच्याशी बोललो, त्यांची विचारपूस केली,त्यांना फोनवरूनच नमस्कार केला! डॉक्टर लहान्यांनी नुकतंच काही दिवसापूर्वीच आशाबाईंच्या डोळ्यांचे ऑपरेशन केलं होतं. हे त्यांच्या बोलण्यातून कळलं. डॉक्टर लहाने यांचा आणि माझा परिचय खूप वर्षांपूर्वी ज्येष्ठ अभिनेते सुहास भालेकर यांनी करून दिला होता , भालेकर काका मला म्हणाले होते चल मी तुला एका महान माणसाची ओळख करून देतो, त्यांना भेटायला मला जे जे हॉस्पिटलला जायचं आहे ! तू पण चल माझ्याबरोबर. मग काही वर्षांनी डॉक्टर लहान्यांनी माझ्या वडिलांचं cataract च ऑपरेशन केलं, आजही 85 वर्षाचे माझे वडील without चष्मा छान वाचन करतात.

त्यानंतर डॉक्टर लहान्यांनी मला जे जे मध्ये डॉक्टरांच्या एका Annual फंक्शन साठी आमंत्रण दिलं होतं, सगळ्या डॉक्टरांचा कार्यक्रम म्हणून मी ब्लेझर Suit घालून गेलो होतो, तर त्या कार्यक्रमासाठी तिथे प्रत्येक डॉक्टरने धोतर,कुर्ता आणि फेटा घातला होता, मराठा मुळा पोशाख प्ररीधान केला होता, त्या सोहळ्याला मी एकटाच पाश्चात्य कपड्यांमध्ये वेड्यासारखा वाटत होतो, मलाच माझी लाज वाटायला लागली. आज पुन्हा एकदा डॉक्टर आनंद भेटून खूप आनंद झाला, आपण कधीही बाबा आमटे, गाडगे महाराज , मदर टेरेसा यांच्यासारख्या महान लोकांना कधी भेटलो नाही, पण मग डॉक्टर लहाने यांना भेटलो आहोत, त्यांचा आशीर्वाद घेतला आहे, म्हणजे आपल्या आयुष्याचं सार्थक झालं, असं मला वाटतं, असे मिलिंद गवळी यांनी म्हटले आहे. 

दरम्यान मिलिंद गवळी यांनी या पोस्टसोबत काही फोटोही शेअर केले आहेत. यात मिलिंद गवळी हे डॉ. तात्याराव लहानेंना हात मिळवताना दिसत आहेत. त्याबरोबरच त्यांच्या या पोस्टवर अनेक चाहते कमेंट करताना दिसत आहेत. 

Read More