Marathi News> मनोरंजन
Advertisement

Pulwama Attack: हल्ल्याच्या निषेधार्थ चित्रनगरी 'बंद'

पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ आज गोरेगाव चित्रनगरीतील चित्रिकरण बंद ठेवण्यात येणार आहे. 

Pulwama Attack: हल्ल्याच्या निषेधार्थ चित्रनगरी 'बंद'

मुंबई : पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. बॉलिवूडमधूनही या हल्ल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ आज गोरेगाव चित्रनगरीतील चित्रिकरण बंद ठेवण्यात येणार आहे.  सिनेकामगार संघटनेने याबाबत घोषणा केली आहे. कलाकार, निर्माते आणि कामगार एकत्रितपणे हल्ल्याचा निषेध करणार आहेत. दुपारी २ ते ४ या वेळेत चित्रिकरण पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असून भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात येणार आहे. 

गोरेगाव चित्रनगरीत सर्वत्र शांतता पाहायला मिळत आहे. कामगार, तंत्रज्ञ, पडद्यामागे काम करणाऱ्या कलाकारांची एकत्रित संघटना आहे. या संघटनेने कोणत्याही प्रकारचे शूटींग पोस्ट प्रोडक्शन तसेच एडिटिंगची कामे करणार नसल्याचे सांगितले आहे. दुपारी २ ते ४ पर्यंत चित्रनगरीत कोणत्याही प्रकारचे काम करण्यात येणार नाही. दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या प्रवेशद्वारासमोर संपूर्ण संघटना एकत्रित येणार आहे. 

'फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने इम्पलॉइज' (एफडब्लूआयसीई) १७ फेब्रुवारी रोजी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहणार असून या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत 'ब्लॅक डे' पाळला जाणार आहे. रविवारी १७ फेब्रुवारी रोजी दुपारी २ ते ४ दरम्यान कोणतेही काम केले जाणार नाही. या वेळेत प्रार्थना सभाही घेण्यात येणार आहे.  हल्ल्याचा निषेध करण्यासाठी संपूर्ण बॉलिवूड गोरेगावमधील फिल्म सिटीबाहेर जमणार आहे. 

१४ फेब्रुवारी रोजी दहशतवादी संघटना 'जैश ए मोहम्मद'कडून करण्यात आला. 'जैश ए मोहम्मद'चा सदस्य असणाऱ्या २२ वर्षिय आदिल दारने सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर आत्मघाती हल्ला घडवून आणला. आरडीएक्ससारख्या स्फोटकांनी भरलेल्या कारची जवानांच्या बसला धडक देण्यात आली. या हल्ल्यात ४०हून अधिक जवान शहीद झाले. अनेक जण जखमी झाले असून अनेकांची स्थिती नाजूक आहे. सुरक्षादलावर झालेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला आहे. 

Read More