Marathi News> मनोरंजन
Advertisement

'पाकिस्तानमध्ये तुम्हाला शरणार्थी असल्याचं वाटणार नाही का?'

जावेद अख्तर यांचा शेखर कपूर यांना सवाल 

'पाकिस्तानमध्ये तुम्हाला शरणार्थी असल्याचं वाटणार नाही का?'

मुंबई : ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी शेखर कपूर यांच्या ट्विटवर नाराजी व्यक्त करत त्यांच्यासमोर काही थेट प्रश्न उपस्थित केले आहेत. आपल्याला बुद्धीजीवी लोकांची भीती वाटत असून, आताच्या घडीला देशात फाळणीनंतरही शरणार्थी असल्याची जाणीव होते. कपूर यांच्या ट्विटमधील या भुवया उंचावणाऱ्या ओळी पाहता गीतकार जावेद अख्तर यांनी त्यांना धारेवरच धरलं. 

फक्त अख्तरच नव्हे, तर बऱ्याच नेटकऱ्यांनीही कपूर यांच्यावर आगपाखड केली. शेखर कपूर यांनी ट्विट करत लिहिलं होतं, 'मी आयुष्याची सुरुवात फाळणीच्या वेळी एक शरणार्थी म्हणून केली होती. आई- वडिलांनी माझ्यासाठी सर्वस्व पणाला लावलं होतं. पण, बुद्धीजीवींची मला कायमच भीती होती. त्यांनी कायमच मला अपूर्ण असल्याची आणि हीन दर्जाची वागणूक केली. तीच मंडळी माझ्या चित्रपटाला यश मिळाल्यानंतर माझी प्रशंसा करत होती. आजच्या घडीलाही बुद्धीजीवींशी गळाभेट करणं म्हणजे जणू काही सर्पदंशच. मी आजही एक शरणार्थीच आहे'. 

कपूर यांच्या या ट्विटला उत्तर देत अख्तर यांनी लिहिलं, 'हा बुद्धीजीवी वर्ग म्हणजे नेमकं कोण? जे तुमची गळाभेट घेत आहेत, त्यांना भेटून तुम्हाला सर्पदंशाची जाणीव होत आहे? श्याम बेनेगल, अदूर गोपाळ कृष्ण, रामचंद्र गुहा....? खरंच का? शेखर साहेब तुमची तब्येत ठीक नसावी बहुधा. तुम्हाला मदतीची गरज आहे, कोणा एका चांगल्या मनोवैज्ञानिकाची मदत घेण्यास अजिबातच कमीपणा किंवा शरमेची बाब समजू नका...'

फक्त इतक्यावरच न थांबता, तुम्हाला शरणार्थी म्हणजे नेमकं म्हणायचं तरी काय आहे? असा प्रश्नही त्यांनी कपूर यांच्यापुढे उपस्थित केला. तुम्हाला भारतात शरणार्थी असल्याची जाणीव होत आहे, तर काय आता पाकिस्तानमध्ये जाऊन ही जाणीव होणार नाही का?, असा संतप्त प्रश्न अख्तर यांनी उपस्थित केला. अख्तर यांच्या ट्विटनंतर शेखर कपूर यांनी एकाच ओळीचं ट्विट करत स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केला. हिंदी कलाविश्वातील ज्येष्ठ व्यक्तींमधील हा वाद बराच चर्चेत राहिला. 

Read More