Marathi News> मनोरंजन
Advertisement

'रज्जो' परतली, पाहा 'दबंग ३'मधील सोनाक्षीचा नवा लूक

'रज्जो इज बॅक.....'

'रज्जो' परतली, पाहा 'दबंग ३'मधील सोनाक्षीचा नवा लूक

मुंबई : 'थप्पड से डर नही लगता साहाब.... प्यार से लगता है...', असं म्हटलं की एक चेहरा लगेचच डोळ्यांसमोर येतो. सलमान खानची मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटातून अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा 'रज्जो'च्या भूमिकेतून झळकली होती. तिचाच हा संवाद. 'रज्जो'च्या याच अंदाजाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आणि पाहता पाहता सोनाक्षीही 'दबंग'चा चेहरा झाली. सध्या याच चित्रपटाच्या तिसऱ्या भागाच्या चित्रीकरणास सुरुवात झाली आहे. सोनाक्षीनेच सोशल मीडियाच्या माध्यमातून याविषयीची माहिती देत या चित्रपटातील तिचा लूक सर्वांच्याच भेटीला आणला आहे. 

'रज्जो इज बॅक.....', असं कॅप्शन लिहित तिने चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात झाल्याचं चाहीर केलं. सोनाक्षीने शेअर केलेल्या या फोटोमध्ये ती गुलाबी आणि सफेद रंगांची रंगसंगती असणाऱ्या एका सुरेख साडीमध्ये पाठमोरी उभी असल्याचं दिसत आहे. मोकळे केस आणि एका बाजूला माळलेली सुंदर फुलं तिचा हा लूक परिपूर्ण करत आहेत. त्यामुळे ही 'रज्जो' चित्रपटापूर्वीच प्रेक्षकांची मनं जिंकत आहे, असं म्हणायला हरकत नाही. 

काही दिवसांपूर्वी अभिनेता सलमान खान यानेही 'दबंग ३'च्या चित्रीकरणास सुरुवात झाल्याची माहिती दिली होती. सध्या सोशल मीडियावर त्याच्या या चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. पण, सोनाक्षीच्या या एका फोटोने दबंग खानलाही मात दिली असं म्हणायला हरकत नाही. येत्या काळात सोनाक्षी 'कलंक' या मल्टीस्टारर चित्रपटातून झळकणार आहे. त्यामुळे ती 'कलंक'ची प्रसिद्धी आणि 'दबंग ३'चं चित्रीकरण अशा विविध गोष्टींमध्ये मेळ साधत आहे. 

'दबंग ३' या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी प्रभुदेवाने आपल्या खांद्यांवर घेतली असून, अभिनेता अरबाज कान हासुद्धा या चित्रपटातून झळकणार आहे. अरबाज या निमित्ताने पुन्हा एकदा 'मख्खी'ची भूमिका साकारणार आहे. ज्यासाठी त्याने मध्य प्रदेशमध्ये चित्रीकरण सुरूही केल्याची माहिती समोर येत आहे. यंदाच्या वर्षी नाताळच्या दिवसांमध्ये भाईजान सलमानचा 'दबंग ३' हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची चिन्हं आहेत. असं झाल्यास रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटाशी त्याची टक्कर होऊ शकते. 

Read More