Marathi News> मनोरंजन
Advertisement

जन्मदात्या वडिलांचं नव्हे, दुसऱ्याच व्यक्तीचं आडनाव लावते दिया मिर्झा

तिच्या वडिलांचं नाव होतं... 

जन्मदात्या वडिलांचं नव्हे, दुसऱ्याच व्यक्तीचं आडनाव लावते दिया मिर्झा

मुंबई : अभिनेत्री दिया मिर्झा हिनं कायमच तिच्या राहणीमानातून अनेकांनाच भारावलं. दियाचे चित्रपट असो किंवा मग वैयक्तिक आयुष्यात घेतलेले काही निर्णय. या अभिनेत्रीनं कायमच चौकटीबाहेर जात काही निर्णयांना आपलंसं केलं आहे. तिचा हाच अंदाज लोकप्रियतेमागचं महत्त्वाचं कारणही ठरत आहे. रुपेरी पडद्यावर दियानं प्रेक्षकांचं जितकं लक्ष वेधलं तितकंच तिच्या खासगी आयुष्यानंही सर्वांच्या नजरा वळवल्या. (Dia Mirza)

घराच्याच अंगणात विवाहबंधनात अडकणं असो किंवा मग आपल्या जन्मदाच्या वडिलांविषयी बोलणं असो, दियानं कायमच पठडीबाहेरच्या गोष्टी निवडल्या. मुकतंच आघाडीच्या मासिकाला दिलेल्या मुलाखतीत तिनं वडिलांसोबतच्या नात्याचा उलगडा केला. 

आपल्या दिवंगत वडिलांच्या काही वस्तू सोबत असाव्यात असं तिला कायम वाटत होतं. पण, तसं झालं नाही. जर्मन आर्टिस्ट फ्रँक हँड्रीच हे दियाचे वडील. ती 9 वर्षांची असतानाच त्यांचं निधन झालं होतं. 

दियाची आई, दीपा या एक बंगाली इंटेरियर डिझायनर होत्या. फ्रँक यांच्यासोबतच्या नात्याला दिया 5 वर्षांची असतानाच तडा गेला होता. ज्यानंतर फ्रँक दुसऱ्या एका कुटुंबासोबत रुळले. तर, दीपा यांनी हैदराबादच्या अहमद मिर्झा यांच्याशी लग्न केलं. त्यांचंच आडनाव दिया तिच्या नावापुढे लावते. 

मासिकाला दिलेल्या मुलाखतीत दियानं सांगितलं, 'वडिलांच्या काही गोष्टी आपल्यासोबत असाव्यात असं मला कायम वाटत होतं. ज्या माझ्या सावत्र भावाकडे गेल्या. वडिलांच्या निधनानंतर त्याचा जन्म झाला होता. काही वर्षांपूर्वी माझा (जर्मन) भाऊ मुंबईत मला आणि माझ्या आईची भेट घेण्यासाठी आला होता. त्यावेळी मी त्याला घरस दाखवत होते. तो तिथं कॉरिडोरमध्ये फिरत होता. जिथं मी खूप सारी छायाचित्र लावली होती. त्यामध्येच आई- वडिलांसोबतची मी, असाही एक फोटो त्यामध्ये होता. त्यावेळी माझ्या मनातलं सर्व दडपण हलकं झालं होतं. वडिलांच्या काही गोष्टी आपल्यासोबत हव्या आहेत अशी इच्छा धुसर झाली. माझ्याकडे आठवणींच्याच रुपात जे काही आहे त्यातच मी समाधानी आहे', असं ती म्हणाली. 

2018 मध्ये दियानं तिच्या वडिलांकडील कुटुंबाची भेट घेण्यासाठी जर्मनीचा दौरा केला होता. त्यावेळी तिनं या दौऱ्याचे काही फोटोही शेअर केले होते. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षापासून वडील, हेच आपले सुपरहिरो होते, असं दियानं सांगितलं. वडिलांशी जोडलं गेलेलं दियाचं नातं हे नेमकं किती खास आहे हेच तिच्या या वक्तव्यातून उलगडत आहे. 

Read More