Marathi News> मनोरंजन
Advertisement

Panipat : 'बाजीराव' रणवीरशी तुलना होण्याविषयी अर्जुन म्हणतो....

 किंबहुना हे सारंकाही..... 

Panipat : 'बाजीराव' रणवीरशी तुलना होण्याविषयी अर्जुन म्हणतो....

मुंबई : अभिनेता अर्जुन कपूर त्याच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत अपेक्षित यश मिळवू शकला नाही असं अनेकांचं म्हणणं. या अपयशातून आपण खूपकाही शिकलो असं खुद्द अर्जुन म्हणतो. यशापशाच्या या गणितांमध्येच अर्जुन आता सज्ज झाला आहे, सदाशिव राव भाऊ यांच्या व्यक्तीरेखेत प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी. अवघ्या काही दिवसांतच त्याचा 'पानिपत' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. पण, या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच अर्जुन साकारत असणारी सदाशिवरावांची भूमिका आणि रणवीरने साकारलेली बाजीराव पेशव्यांची भूमिका यामध्ये तुलना होण्यास सुरुवात झाली आहे. 

रणवीरने साकारलेली बाजीरावांची भूमिका भावल्याचं म्हणत काहींनी अर्जुनच्या भूमिकेत कमतरता असल्याचं म्हटलं. पण, आपण मात्र या तुलनांसाठी आणि प्रतिक्रियांसाठी तयार होतो, किंबहुना हे सारंकाही अपेक्षित असल्याची प्रतिक्रिया अर्जुनने दिली. 

'हिंदुस्तान टाईम्स'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, 'मी त्यासाठी तयार होतो. कारण कोणत्याही गोष्टीमधील बारकावे आणि त्यांचं मूळ स्वरुप हे तुलनांना वाव देतं. भन्साळी सर हे अगदी अस्सल गोष्टींना प्राधान्य देतात. त्याचप्रमाणे आशुतोष सरही आहेत. त्यांना जे काही प्रेक्षकांना दाखवायचं आहे, ते दाखवण्यापासून ते कधील मागे येत नाहीत', असं अर्जुन म्हणाला. 

या भूमिकेमुळे होणाऱ्या तुलना लक्षात घेता, मी जर टक्कल करण्याचा निर्णय घेतला नसता तर हा या चित्रपटाचा, त्या कालाचा आणि अनेकांच्या भावनांचा अनादर झाला असता. मी या सर्व तुलनात्मक प्रतिक्रियांकडे अशाच दृष्टीने पाहतो की आम्ही योग्य मार्गावर आहोत, असं स्पष्टीकरण त्याने दिलं. 

आशुतोष गोवारिकर दिग्दर्शित 'पानिपत' हा चित्रपट ६ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे. मराठा साम्राज्याचा इतिहास आणि त्यामधील काही महत्त्वाच्या घडामोडी पाहता, त्यातीलच पानिपतच्या लढाईवर या चित्रपटातून प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. त्यामुळे या सर्व तुलना बाजूला सारत प्रेक्षक चित्रपटाला कसा प्रतिसाद देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

Read More