Marathi News> मनोरंजन
Advertisement

सिल्क स्मिताविषयीच्या 'या' गोष्टी माहित आहेत?

बोल्ड अंदाजासाठी प्रत्येक चित्रपटात तिला भूमिका मिळू लागल्या आणि... 

सिल्क स्मिताविषयीच्या 'या' गोष्टी माहित आहेत?

मुंबई : सिल्क स्मिता, या अभिनेत्रीचं नाव घेतलं की तिच्याभोवती असणाऱ्या चर्चा आणि वादांची वर्तुळं सर्वांचं लक्ष वेधतात. अशा या अभिनेत्रीने आपल्या ३५ वर्षांच्या जीवनात असे काही दिवस पाहिजे ज्यामध्ये प्रसिद्धीसोबतच काही नकोशा गोष्टींनाही तिला सामोरं जावं लागलं. जिच्या सौंदर्य आणि अदांनी अनेकजण घायाळ होत होते त्याच सिल्क स्मिताला अखेर आपलं आयुष्य संपवावं लागलं होतं. 

कारकिर्दीमध्ये एकेकाळी सिल्क स्मिता इतकं यश संपादन करु लागली होती जे पाहता इतरांना तिचा हेवाच वाटला. पण, याच कारकिर्दीने तिला असा काहळही दाखवला जेव्हा सिल्कला कोणाचीही साथ किंवा आधार मिळाला नाही. स्वत:च्याच मुल्यांवर चालणारी सिल्क ही तिच्या मर्जीची राणी होती. पण, झगमगाटाच्या या विश्वात ती अशीकाही वाहत गेली की वास्तवाची आणि अशाश्वततेची जाण तिला राहिलीच नाही. 

आंध्र प्रदेशमध्ये एका गरीब कुटुंबात २ डिसेंबरला जन्मास आलेल्या विजयलक्ष्मीने आपण दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा एक काळ गाजवू याचा विचारही केला नसावा. ही तिच विजयलक्ष्मी होती, जी पुढे जाऊन सिल्क म्हणून ओळखली जाऊ लागली. असं म्हटलं जातं की कुटुंबात गरीबी असल्या कारणाने तिला चौथी इयत्तेत असतानाच शिक्षण सोडावं लागलं. तिचं लग्न लावून देण्यात आलं. पण, सासुरवासाला कंटाळून तिने थेट चेन्नई गाठली. जिथे ती नातेवाईकांकडे राहू लागली. घरखर्चासाठीचे पैसे कमवावेत या हेतूने ती एका अभिनेत्रीकडे घरकाम करु लागली. काही काळानंतर ती त्याच अभिनेत्रीची मेकअप आर्टीस्ट झाली. 

fallbacks

नजरेने घायाळ करणाऱ्या या विजयलक्ष्मीवर चित्रपट दिग्दर्शकांची नजर पजडताच तिला चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या. लहान भूमिकांनी सुरुवात करणाऱ्या या अभिनेत्रीला खरी ओळख मिळाली 'वंडी चक्रम' या चित्रपटातून. या चित्रपटात तिने साकारलेली 'सिल्क' तिला खरी ओळख देऊन गेली आणि सोबतच हे नावही. पाहता पाहता सिल्क स्मिता प्रसिद्धीझोतात आली. तिच्या असण्यामुळे चित्रपटांमध्ये कॅब्रे नृत्य असणारी गीतं चित्रीत केली जाऊ लागली. जवळपास १७ वर्षांच्या कारकिर्दीत सिल्कने तामिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी अशा भाषांमध्ये ४५०हून जास्त चित्रपटांमध्ये काम केलं. 

स्वत:ला झोकून देत काम करणारी सिल्क त्या काळात ५० हजार रुपये इतकं मानधन घेत होती. त्या काळात हा आकडा अनेकांच्या भुवया उंचावत होता. यशाच्या एका टप्प्यावर पोहोचल्यानंतर सिल्कने चित्रपट निर्मितीमध्ये प्रवेश केला. पण, यात मात्र ती अपयशी ठरली. हा तोच काळ होता, जेव्हा सिल्क स्मिताच्या कारकिर्दीच्या उतरतच्या काळाची सुरुवातच झाली होती. या टप्प्यावर तिला एका आधाराची गरज होती. पण, हा आधार मात्र तिला कधी कायमस्वरूपात मिळाला नाही. याच एकटेपणाच्या जाळ्यात अडकलेल्या सिल्क स्मिताने अखेर चेन्नईतील निवासस्थानी आत्महत्या केली. सिल्क आणि तिच्या आयुष्याशी जोडली गेलेली अनेक रहस्य ही तिच्यासोबतच साऱ्यांचा निरोप घेऊन गेली... मागे राहिले ते असंख्य अनुत्तरित प्रश्न. 

 

Read More