Marathi News> मनोरंजन
Advertisement

Exclusive : रिकी मार्टीनच्या गाण्यासाठी मराठमोळ्या नेहा महाजनचं सतारवादन

वेगळ्या तंत्राचा वापर करत तयार केलं गाणं... 

Exclusive : रिकी मार्टीनच्या गाण्यासाठी मराठमोळ्या नेहा महाजनचं सतारवादन

सायली पाटील, झी मीडिया, मुंबई : कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळं लॉकडाऊन लागू करण्यात आला आणि अनेक व्यवहार ठप्प झाले. पण, नव्या तंत्राच्या माध्यमातून काही गोष्टी मात्र अधिक प्रभावीपणे समोर आल्या. नव्या संधी उपलब्ध झाल्या. अशीच एक संधी चालून आली अभिनेत्री नेहा महाजन हिच्याकडे. अभिनयासोबतच संगीत कलेमध्ये रुची असणाऱ्या नेहाची सतार वादनाची कला या संधीच्या निमित्तानं एका वेगळ्याच स्तरावर जाऊन पोहोचली. याला निमित्त ठराला तो म्हणजे रिकी मार्टीन Ricky Martin . 

आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या संगीताची आवड असणाऱ्यांसाठी रिकी मार्टीनचं नाव काही नवं नाही. अशा या गीतकार आणि गायकासोबत काम करण्याची संधी नेहाला मिळाली. याच संधीच्या निमित्तानं थेट रिकीच्याच Pausa या अल्बममधील Mi Sangre या गाण्यासाठी नेहानं तिच्या सतारवादनाचं योगदान दिलं. आपण बाह्यरुपानं कितीही वेगळे असलो तरीही अंतर्मनानं आपण एक मनुष्य आहोत, एकसारखे आहोत असा या गाण्याचा अर्थ. ज्यासाठी नेहानं सतारवादन केलं. कलेचा हा नजराणा सादर करत तिनं भारतीय संगीताचं आणि आपल्या देशाचं या ठिकाणी प्रतिनिधीत्वं केलं. ज्यासाठी खुद्द रिकीनेही नेहाचे आभार मानत तिच्या कलेची दाद दिली. 

एक अभिनेत्री म्हणून नावारुपास येणाऱ्या नेहासाठी संगीतकलेच्या माध्यमातून तिला मिळालेली ही पोचपावली अतिशय महत्त्वाची आहे. झी २४तासशी संवाद साधतेवेळी नेहानं तिचा आनंद व्यक्त केला. 

मागील १३ वर्षांपासून नेहानं अभिनयासोबतच सतारीचं शिक्षण घेणंही सुरु केलं. ज्यानंतर तिनं या कलेवर प्रभुत्वही मिळवलं. नेहाच्या सोशल मीडिया पोस्ट पाहता याचा अंदाज येतो. रिकीसोबतच्या या गाण्याची संधी कशी मिळाली, याबाबत सांगताना नेहा म्हणाली; जानेवारी महिन्यात रिकीकडून या गाण्यासाठीचा फोन मला आला. ज्यामध्ये भारकाचं प्रतिनिधीत्वं करत सतार वादन करशील का असं मला विचारण्यात आलं. मुळात रिकीला शाळेपासून मी ऐकत होते, त्यात संगीतामध्ये रागसंगीतावर माझा जास्त भर. त्यामुळं त्याच्या निमित्तानं काहीतरी नवं शिकण्याची संधी मला मिळाली'. 

fallbacks
रिकीनं अशा पद्धतीनं मानले नेहाचे आभार... 

कोरोनामुळं लॉकडाऊन असल्या कारणानं नेहानं मुंबईतच तिच्या पद्धतीनं या गाण्याच्या गरजेनुसार सतारवादनाची तयारी केली. प्रसन्ना विश्वनाथन या साऊंड रेकॉर्डिस्टच्या मदतीनं तिनं हे वादन रेकॉर्ड करत ते रिकीपर्यंत पोहोचवलं आणि अर्थातच त्यानंही तिच्या या कलेली भरभरून प्रशंसा केली. 

वेगळ्या तंत्राचा वापर करत तयार केलं गाणं... 

Pausa या अल्बमचं नवं “Headphone Edition” पुन्हा चाहत्यांच्या भेटीला आणत रिकीनं संगीतप्रेमींसाठी एक नवा नजराणा सादर केला. ज्यामध्ये त्यानं “Orbital Audio” या तंत्राचा वापर करत श्रोत्यांना एक नवी श्रवणीय मेजवानीच दिली आहे. एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जाणारं हे गाणं आणि रिकीचा हा अल्बम, त्याला मिळालेली नेहाची सतार वादनाची साथ सध्या आंतरराष्ट्रीय संगीत जगतामध्ये बरंच चर्चेत आहे. 

 

Read More