Marathi News> मनोरंजन
Advertisement

'सर्वांचे आभार, आशा आहे की...', अभिनेत्रीच्या आरोपांनंतर मोहनलाल यांचा मोठा निर्णय; मल्याळम चित्रपटसृष्टीत खळबळ

मिनूने फेसबुक पोस्टमधून मल्याळम चित्रपटसृष्टीतील काही अभिनेते आणि तंत्रज्ञांवर शारिरीक आणि शाब्दिक छळ केल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी कायदेशीर पाऊलही उचलण्यात आलं आहे. दुसरीकडे सदस्यांनी आरोपानंतर असोसिएशन ऑफ मल्याळम मूव्ही आर्टिस्टचा (AMMA) राजीनामा दिला आहे.    

'सर्वांचे आभार, आशा आहे की...', अभिनेत्रीच्या आरोपांनंतर मोहनलाल यांचा मोठा निर्णय; मल्याळम चित्रपटसृष्टीत खळबळ

मल्याळम चित्रपटसृष्टी सध्या शारिरीक अत्याचार आणि महिलांचं शोषण केल्याच्या आऱोपांमुळे चर्चेत आहे. इंडस्ट्रीमधील महिलांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या हेमा कमिटीचा अहवाल समोर आला आहे. यानंतर अनेक महिला कलाकार समोर येऊन आपल्याला आलेले अनुभव शेअर करत आहेत. यामध्ये अभिनेत्री मिनू कुरियनचाही समावेश आहे. मिनूने एक फेसबुक पोस्ट शेअर केली असून यामध्ये तिने मल्याळम चित्रपटसृष्टीतील काही अभिनेते आणि तंत्रज्ञांवर शारिरीक आणि शाब्दिक छळ केल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी कायदेशीर पाऊलही उचलण्यात आलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मिनूने त्या सर्व 7 जणांना ई-मेल पाठवून लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार केली होती ज्यांच्यावर तिने फेसबुक पोस्टमध्ये आरोप केले होते. यामध्ये मल्याळम अभिनेता- सीपीआयएम आमदार मुकेश, अभिनेते जयसूर्या आणि इदावेला बाबू यांचा समावेश आहे. 

फेसबुक प्रोफाईलमध्ये मिनूचं नाव मिनू मुनीर आहे. तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "मल्याळम इंडस्ट्रीत माझ्यावर झालेला शारिरीक आणि शाब्दिक छळ याला वाचा फोडण्यासाठी ही पोस्ट लिहित आहे. यामध्ये मुकेश, मनियम पिल्ला राजू, इदावेला बाबू, जयसूर्या, वकील चंद्रशेखरन आणि प्रोडक्शन कंट्रोलर नोबल, विचू आहेत".

पुढे तिने लिहिलं आहे की, "2013 मध्ये एका प्रोजेक्टमध्ये काम करत असताना मी या व्यक्तींच्या हाते शारिरीक आणि शाब्दिक शोषणाला बळी ठरले. मी त्यांना सहकार्य आणि काम करण्याचा प्रयत्न केला. पण आता हे शोषण सहनशीलतेलच्या पलीकडे गेलं आहे". मिनूने 7 पैकी काही जणांविरोधात लैंगिक अत्याचार आणि काहींविरोधात शाब्दिक अत्याचाराचा आरोप केला आहे. 

मल्याळम कलाकार संघटनेचा राजीनामा

हेमा कमिटीच्या अहवालानंतर मल्याळम चित्रपटसृष्टीत खळबळ माजली असून अनेक घडामोडी घडत आहेत. मल्याळम इंडस्ट्रीची संस्था असोसिएशन ऑफ मल्याळम मूव्ही आर्टिस्ट्सच्या (AMMA) सर्व सदस्यांनी राजीनामा दिला आहे. 

माहितीनुसार, हेमा समितीच्या अहवालानंतर, नियामक मंडळाच्या काही सदस्यांवर लावण्यात आलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांची नैतिक जबाबदारी घेत AMMA च्या संपूर्ण प्रशासकीय समितीने राजीनामा दिला आहे. मल्याळम सिनेमाचे आयकॉन मोहनलाल हे या असोसिएशनचे अध्यक्ष होते आणि त्याची 17 सदस्यांची कार्यकारी समिती होती.

असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, 2 महिन्यांत असोसिएशनच्या सर्वसाधारण सभेची बैठक होईल ज्यामध्ये नवीन प्रशासकीय मंडळाची निवड केली जाईल. एका निवेदनात म्हटलं आहे की, 'आम्हाला आशा आहे की AMMA ला एक नवीन नेतृत्व मिळेल, ज्यात AMMA चा गमावलेला आत्मविश्वास पुन्हा आणण्याची आणि त्याला मजबूत करण्याची क्षमता असेल. टीका आणि मार्गदर्शनासाठी सर्वांचे आभार",

मीनूने इडावेला बाबूवर मल्याळम मूव्ही आर्टिस्ट्स (AMMA) च्या सदस्यत्वाच्या बदल्यात शारिरीक सुख मागितल्याची ऑफर दिल्याचा आरोप केला होता. अलीकडेच ज्येष्ठ मल्याळम अभिनेते सिद्दीकी यांनी AMMA च्या सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला होता. एका अभिनेत्रीने त्यांच्यावर लैंगिक छळाचा आरोपही केला होता.

Read More