Marathi News> ब्लॉग
Advertisement

संघर्षवीरांची मुंबई सफर...

 'झी २४ तास'ने याच संघर्षवीरांना विश्वचषक विजेत्या डबल डेकर बसमधून मुंबईची सफर घडवली... 

संघर्षवीरांची मुंबई सफर...

संकटं समोर आली की रडत बसायचं की लढत रहायचं हा खरंतर ज्याचात्याचा प्रश्न. मात्र यशस्वी व्हायचं असेल तर अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत रडत न बसता संकटावर मात करत लढत राहिलं की यश हे मिळतेच. यशाची हीच गुरूकिल्ली आपल्या रोमरोमात भिनलेल्या संघर्षवीरांचा कौतुक सोहळा मुंबईत पार पडला. 'झी २४ तास'ने याच संघर्षवीरांना विश्वचषक विजेत्या डबल डेकर बसमधून मुंबईची सफर घडवली...  

'झी २४ तास'च्या संघर्षाला हवी साथ या उपक्रमाअंतर्गत दहावीच्या परीक्षेत ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव मुंबईत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या संघर्षवीराचे कौतुक करण्यासाठी  'झी २४ तास'चं मुख्य संपादक विजय कुवळेकर, कार्यकारी संपादक प्रसाद काथे, राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण आणि उच्च तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर, अप्पर पोलीस  आयुक्त रवींद्र  शिसवे, ज्येष्ठ साहित्यिक सुरेश खरे, ज्येष्ठ अभिनेता-दिग्दर्शक प्रमोद पवार आदींसह शालेय मुलांचीही खास उपस्थिती होती.  या उपक्रमाचं हे पाचवं वर्ष. या संघर्षवीरांची कहाणी 'झी २४ तास'वर पाहून या मुलांच्या पाठिशी उभे राहण्यासाठी आणि त्यांना आर्थिक मदत देण्यासाठी अनेक हात पुढे आले. मुलांना आलेले मदतीचे धनादेश या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले.  

fallbacks

राज्यातूनच नव्हे तर अगदी  परदेशातूनही या मुलांसाठी मदतीचा ओघ वाढतोय. 'झी २४ तास'च्या या उपक्रमामुळे आम्हांला बळ मिळतंय, पुढील शिक्षण तर आम्ही घेणारचं पण ज्या दात्यांनी आम्हांला मदत केली त्यांचे ऋण आम्ही कधीच विसरणार नाही अशी या विद्यार्थ्यांची  बोलकी  प्रतिक्रिया बरंच काही बोलून गेली. मुलांचा हा कौतुक सोहळा पाहताना त्यांच्योसोबत आलेल्या पालकांसाठी जणू आयुष्यभर आठवणीत राहणारा क्षण ठरला.मुलांच्या संघर्षाची कहाणी ऐकूण पालकांसह उपस्थित सर्वांच्याच डोळ्याच्या कडा पानावल्या. हे  आनंदाश्रू होते परिस्थितीला जिद्दीने सामोरे जाणाऱ्या या लढवय्यांसाठी.

डबल डेकर बसमधून मुंबई दर्शन...

fallbacks

यावर्षीही या गुणवंत विद्यार्थ्यांना 'झी २४ तास'ने मुंबई दर्शनाची अनोखी सफर घडवली. खरंतर आतापर्यंत या मुलांपैकी बहुतेकांनी मुंबई पाहिलीच नव्हती. पहिल्यांदाच मुंबई आल्याने ते एक आनंदाचे, उत्सुकतेचे भाव सगळ्यांच्याच चेहऱ्यावर दिसत होते. अनेकजण तर आपण ज्या गावात राहातो, त्या गावच्या जिल्ह्याच्या ठिकाणीही आलेले नव्हते. या मुलांपैकी काहींना आजही राहण्यासाठी पक्के घर नाही. छोटीशी झोपडी किंवा कुठेतरी उभारलेलं पाल हेच यांचं घरकुल. त्यामुळे पालकांसोबत या विद्यार्थ्यांचाही  रोजच्या जगण्याशी रोजच नवा संघर्ष. काहींच्या डोक्यावरचं छत्र हरपलेलं. कुणाला आईची माया काय असते हेच अनुभवायला मिळाले नाही. तर काहींना वडिल नाहीत. मात्र प्रत्येकाची जिद्द, काहीतरी करून दाखविण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती हेच यांचे भांडवल. बरेचदा तुमच्याकडे सगळंकाही असतं, मात्र आपल्याकडे काहीच नाही असं अनेकांचं रडगाणं सुरू असतं. मात्र या कोवळ्या वयात आर्थिक परिस्थितीशी दोनहात करताना, संघर्ष करताना खरंतर हाती काहीच नाही अशी भावना आपोआप येऊ शकते.मात्र अशा परिस्थितीत या मुलांची चिकाटी, त्यांची जिद्द आणि त्यांचा संघर्ष. यातूनच त्यांच्याकडे दहावीच्या परीक्षेत मिळालेल्या यशामुळे 'गुणवंत विद्यार्थी'  म्हणून जमा झालेला हा ठेवा.

या मुलांचा संघर्ष जगण्याचं बळ देतो - आदेश बांदेकर : 

आदेश बांदेकर आणि संघर्षाला हवी साथ हे एक जिव्हाळ्याचं नातं आता निर्माण झालंय. या मुलांचा संघर्ष पाहून मला माझ्या लहनपणाची आठवण येते. आपल्याला सगळं काही मिळतं, मात्र तरीही आपण रडत असतो. या मुलांकडे पाहून जगण्याचं बळ येतं. प्रत्येकाचा संघर्ष त्याची कहाणी अचाट आहे. म्हणून हालाखीच्या परिस्थितीत त्यांनी मिळवलेलं हे यश त्यांच्या जिद्दीची रेखा अधोरेखीत करतं. या मुलांसाठी मला स्वतःला त्यांच्यासोबत वेळ घालवता आला, त्यांच्या चेहऱ्यावर काही क्षण का होईना हास्य फुलवता आलं, त्यांना गाताना पाहून त्यांची खुललेली कळी पाहून मला स्वतःला खूप समाधान आणि आनंद मिळाला.

fallbacks

आजचा दिवस मात्र या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक वेगळा दिवस. 'झी २४ तास'ने या मुलांचा गौरव तर केलाच. त्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर झळाळत होता. याहून अधिक या मुलांसोबत आलेल्या पालकांच्या चेहऱ्यावरचं समाधानही अधिक बोलकं होतं. 'झी २४ तास'ने या मुलांना डबल डेकर बसमधून मुंबई दर्शन घडवलं. मुंबईच्या बेस्ट बसच्या डबल डेकर बसमधून मुंबई पाहतानाचे या मुलांच्या चेहऱ्यावरचे भाव अगदी बघण्यासारखे होते. घराघरात होम मिनिस्टर म्हणून प्रसिद्ध असलेले लाडके भावोजी सलग तिसऱ्या वर्षी या मुलांना बसमधून मुंबई दर्शन घडविण्यासाठी आवर्जून आले होते. विश्वचषक विजेत्या महेंद्र सिंह धोनीने जिंकलेल्या भारतीय क्रिकेट संघाची ज्या डबल डेकर बसमधून मुंबईत मिरवणूक काढण्यात आली होती, त्याच नीलांबरी बसमधून या संघर्षवीरांना मुंबई दाखविण्यात आली. सिद्धीविनायक मंदिरापासून ते हाजी अली, मरीन ड्राईव्ह, गेटवे ऑफ इंडिया, मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल असा प्रवास करत मुलांना ही मुंबई दर्शनाची सफर घडविण्यात आली. या प्रवास आदेश बांदेकर यांनीही त्यांच्या अनेक आठवणी या मुलांसोबत शेअर केल्या.

या मुलांसोबत अंताक्षरीचा खेळही चांगलाच रंगला. होम मिनिस्टरमधून नेहमी टीव्हीवर पाहिलेल्या आदेश बांदेकर यांना एवढ्या जवळून पाहताना प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावरचे भाव पाहण्यासारखे होते. तसंच या मुलांसोबत त्यांचा संघर्ष जाणून घेत या मुलांना खुलवण्याचं काम आदेश बांदेकर यांनी अगदी मनापासून केलं. त्यामुळे या मुलांशी गप्पा मारत-मारत, दंगामस्ती करत आणि गाण्यांची धमाल करत आदेश बांदेकर आणि मुलांची ही मुंबई दर्शनची सफर चांगलीच रंगतदार ठरली. सिद्धीविनायक मंदिरात या मुलांना सिद्धीविनायकाचं खास दर्शन घडवण्यात आलं. त्यांचा मंदिरात खास भेट देऊन गौरवही करण्यात आला. एकूणच आजचा दिवस या मुलांसाठी म्हणूनच खास होता. मुंबईच्या उंचच उंच इमारती, वाहनांची वर्दळ आणि सोबतीला सेलिब्रिटी आदेश बांदेकर...या सगळ्या मुंबई दर्शनच्या सफरीमध्ये मुलांच्या आणि त्यांच्या पालकांच्याही चेहऱ्यावर झळकलेला आनंद लाखमोलाचा समाधान देऊन गेला.  

 

Read More