Marathi News> ब्लॉग
Advertisement

माय-लेकाची 'नाळ' जोडणारा भावस्पर्श

संवाद नाही म्हणून आई लेकराची नाळही तुटते का ?

माय-लेकाची 'नाळ' जोडणारा भावस्पर्श

झी 24 तासाच्या वृत्तनिवेदिका आणि निर्मात्या सुवर्णा धानोरकर यांनी या ब्लॉगमधून आई आणि मुलगा यांच्या नातेसंबंधांबाबत वैयक्तिक अनुभव मांडला आहे. शिवाय या नातेसंबंधात कालानुरूप कसे बदल होत जातात त्यावर काही प्रश्नही उपस्थित केले आहेत.

सुवर्णा धानोरकर, मुंबई : कार्यालयीन कामानिमित्त 2 दिवस मुलाला सोडून बाहेरगावी जावं लागलं. जाताना विशेष काही वाटलं नाही. बैठक संपली. रात्री सगळे मिळून मस्त धमाल केली. मग जेवत असतानाच घरून फोन आला. नवरोबाचे शब्द ऐकले आणि मन सैरभैर झालं. त्याचं एकच वाक्य फोन ठेवल्यावरही सतत ऐकू येत होतं, 'तू आल्याशिवाय झोपणार नाही असं विहान म्हणतोय...' उत्तरादाखल झोप आली की झोपेल तो, तू झोप मॉर्निंग शिफ्ट आहे ना उद्या तुझी, झोप झाली पाहिजे.' हे बोलले खरे पण समजूत नवऱ्याची काढली की स्वतःची, हेच कळे ना... मुलाचा चेहरा नजरेपुढून जात नव्हता. पुन्हा स्वतःलाच समजावणं सुरु होतं. झोपेल तो. आता काय लहान आहे! आणि मी मग सहकाऱ्यांसोबत गप्पा मारायला लागले. रात्री खोलीत मैत्रिणींसोबत गप्पा मारता मारता कधी झोप लागली कळलंही नाही. 

सकाळी येतानाही मी मजेत येत होते. सहकाऱ्यांसोबत कशी धमाल केली याबाबत चर्चा सुरू होती, ठाण्यात पोहोचले आणि घरून फोन आला, फोन कानाला लावताच झोपेतला, रडवेला, भावनिक आवाज कानी पडला, 'आई लवकर ये ना, मला तुझी आतवन (आठवण) येते' अर्धा तासात येते अस सांगून मुलाची समजूत काढली आणि फोन ठेवला. पुढचा अर्धा तास 4 तासांसारखा वाटला. पण याच दरम्यान स्वतःची सत्काराची फुलं खास माझ्या मुलासाठी देणाऱ्या दीपक सरांचे (Deepak Bhatuse) आभार, 'घेऊन जा तुझ्या मुलासाठी.' दीपक सरांचं हे वाक्य ऐकलं आणि विहान ही फुलं पाहून किती आनंदित होईल याचं चित्र माझ्या डोळ्यांपुढे उभं राहिलं. घरी आले तर साहेब पुन्हा झोपलेले, कानाजवळ जाऊन हळूच हाक मारली विहान, लेकरू गाढ झोपेतही आईलाच पाहात होतं जणू, एका हाकेत उठून माझ्या मिठीत, 'आई तू रात्री का नाही आली मला आतवन (आठवण) येत होती ना'.इवल्याशा हातांची एक छानशी मिठी, मग पुढे अखंड बडबड सुरू, तू फुलं का आणली, कुणी दिली, का दिली, माझ्यासाठी काय आणलं, तिथे काय काम होतं, मला का नाही नेलं, तू काय जेवलीस, माझी आठवण आली का आणि अजून बरंच काही. समाधान होईस्तोवर सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली.

संध्याकाळी बाबा घरी आला आणि मग बाबाच्या मागे मागे लेकराची पळापळ. मला फिरायला ने, मला खेळायला ने. तेवढ्यात मी पुन्हा भावनिक व्हावं, माझ्या मनांत प्रश्नांनी फेर धरावा असं काही बाबाने सांगितलं. 'काल दुपारी याच्या बोलण्याचा आवाज आला, मला वाटलं तुला कॉल केला आणि तुझ्याशी बोलतोय मी येऊन पाहिलं तर टेडी बेअरला तुझा स्टोल पांघरून आई म्हणून त्याच्याशी बोलत होता. रात्री जेवताना पुन्हा तेच, त्याला खूपच आठवण येत होती तुझी.' नवऱ्याचं बोलणं संपलं. पण हे सगळं ऐकून काय प्रतिक्रिया द्यावी याच विचारात. स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव झाली. 'आई' कविता आठवली. माझी आई माझ्या डोळ्यांपुढून गेली. लगेच मनात आलं मी नसते गेले तर, मग पुन्हा मनात आलं, नसते गेले तर ही #नाळ कळली नसती. आई आणि लहान लेकरू दुरावलं की काय होतं हे कळलं नसतं. मी घरी गेल्यावर मुलाची प्रतिक्रिया काय हे मी बागेश्रीनी आज ऑफिसला गेल्यावर विचारलं, तीनही सांगितलं कसं तिचं मुलं रात्री तिच्याशिवाय झोपलं, आणि तिचेही डोळे भरून आले. ऑफिसला जाणाऱ्या प्रत्येक आईची हीच अवस्था.

एक विचार सतत मनात येतोय, आई नाही तर तिचे कपडे किंवा तिच्या वस्तू जवळ घ्याव्या त्यांनाच आई समजावं, त्यांच्याशी गप्पा माराव्या हे कसं काय कळतं मुलांना, दिवसभर आईशिवाय राहत असलेलं मुलं रात्रीच्या वेळी तिच्यासाठी का अस्वस्थ होतं, का झोपताना आईचाच स्पर्श हवा असतो, बाबा प्रेम करत नाही का, बाबाच्या स्पर्शात प्रेम जाणवत नाही का... असं काय रसायन आहे या 2 अक्षरात की ती आसपास असली की तिच्याकडे लक्षच नसतं, पण ती जरा दूर गेली की आपला श्वास हिरावून घेतल्याची जाणीव होते. का असतं प्रत्येकाचं आईशी इतकं दृढ नातं, नाळच का ती आई आणि लेकराला बांधून ठेवणारी? मग जी मुलं पैशासाठी आईच्या जीवावर उठतात त्यांचं काय, त्यांची नाळ नसते का आईशी जुळलेली? त्याला नाही का वाटत ती लंगड्याचा पाय, वासराची गाय दुधावरची साय... की मग ही सारी देण आजच्या बदलत्या वातावरणाची, आसपासच्या घटनांची. आईला मुलानचं मारलं अशा पेपरात वाचलेल्या, टीव्हीवर पाहिलेल्या बातम्यांची... कुणाची बर ही देण, लहानपणी ज्या आईच्या पदराच टोक सोडवत नाही, मोठेपणी तिच्याच जीवावर का बरं उठत लेकरु? की मग संवाद राहिला नाही नात्यात आणि मग एकटी पडलेली मुलं भरकटली वाहवत गेली, वाया गेली. संवाद नाही म्हणून नाळही तुटली का आई लेकराची?

Follow on Twitter : https://twitter.com/Suvarnayb

Read More