Marathi News> ब्लॉग
Advertisement

गोष्ट एका बदलीची....!

महिला अधिकाऱ्याच्या बदल्याचं राजकारण... पिंपरी-चिंचवडमध्ये महापालिकेत चाललंय काय?  

गोष्ट एका बदलीची....!
Updated: Sep 20, 2022, 04:04 PM IST

कैलास पुरी,झी मिडिया पिंपरी चिंचवड  : जवळपास 7 दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांची बदली झाली आणि त्यांच्या जागी महापालिकेतच असणाऱ्या सहाय्यक आयुक्त स्मिता झगडे यांची त्या जागी वर्णी लागली. तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांच्या बदलीनंतर ढाकणे यांची बदली औपचारिकता होती. तिथे कोण येणार याची उत्सुकता असताना त्या ठिकाणी स्मिता झगडे यांची नियुक्ती झाल्याने अनेकांना आश्चर्य वाटले. 
         
अतिरिक्त आयुक्त पदासारखी महत्वाची जबाबदारी मिळणार असे स्मिता झगडे यांना वाटत असतानाच महापालिकेतील राजकारणाचा फटका झगडे यांना बसला. सात दिवस झाले तरी आयुक्त शेखर सिंग स्मिता झगडे यांना पदभार स्वीकारू देत नाहीत. 

ढाकणे यांच्या बदलीनंतर दुसऱ्याच दिवशी पदभार स्वीकारण्याची तयारी करणाऱ्या झगडे यांना अजून ही पदभार मिळालेला नाही. अर्थात त्यामुळे महापालिका वर्तुळात अनेक चर्चाणा उधाण आलंय..! तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांनी त्यांचा अर्जुन म्हणून विकास ढाकणे यांना आणले होते तसेच आयुक्त शेखर सिंग यांना त्यांच्या विश्वासातील अर्जुन अतिरिक्त आयुक्त पदावर बसवायचा असल्याची चर्चा आहे...! 
         
दुसरीकडे काही।लोकप्रतिनिधींना स्मिता झगडे अतिरिक्त पदावर नको असल्याची चर्चा आहे.! शेखर सिंग ज्या दिवशी आयुक्त पदाची सूत्रे हातात घेणार होते त्या दिवशीच योगायोगाने शेखर सिंग आणि या आमदाराचा।मंत्रालयातील भेटीचा फोटो जाणीवपूर्वक व्हायरल करण्यात आला. 

अर्थात शेखर सिंग कोणाच्या ऐकण्यावरून काम करणार हे त्यातून  स्पष्ट झाले होते. त्यामुळे या लोकप्रतिनिधीची मर्जी राखण्यासाठी शेखर सिंग यांनी झगडे यांना पदभार दिला नसेल तर त्यात आश्चर्य नाही..! 

महापालिके सारख्या स्वायत्त संस्था म्हंटल की अधिकाऱ्यांचे लॉबिंग, त्यांच्या मर्जीतील अधिकारी हे ओघाने आलेच. पण एखाद्या व्यक्तीची निवड झाली असताना त्यांना पदभार घेऊ न देणे हे मात्र नैतिकतेला शोभून दिसणारे नाही..! 

विशेष म्हणजे पालिकेतीलच साह्ययक आयुक्त सारख्या महत्वाच्या पदावर काम करणाऱ्या महिला अधिकाऱ्याची अशा पद्धतीने अपमानास्पद वागणूक योग्य नाही. पदभार का मिळत नाही याची विचारणा करण्यासाठी स्मिता झगडे दिनांक 19 अर्थात सोमवारी आयुक्त शेखर सिंग यांच्याकडे गेल्या. 

सकाळी 10 ला शेखर सिंग यांनी त्यांना पाहिले. मात्र 3 वाजल्या तरी त्यांना भेटण्यासाठी बोलावले नाही. पदभार देणे किंवा न देणे हा त्यांचा अधिकार असला तरी ज्या पद्धतीने त्यांनी झगडे यांना वागणूक दिली ते पाहता हे कोणत्याच पातळीवर त्यांना शोभत नाही. 

सहाय्यक आयुक्त पदावर काम करणाऱ्या अधिकारी महिलेला अशी वागणूक मिळत असेल तर सध्या कर्मचाऱ्याला काय वागणूक मिळेल याचा विचार न केलेलाच बरा..! 

स्मिता झगडे यांना पदभार द्यायचा की नाही ते शेखर सिंग यांनी ठरवावे. शहरात अनेक प्रश्न आहेत , पावसाने रस्ते उदवस्थ आहेत, वाहतुकीच्या समस्या आहेत इतर ही अनेक समस्या आहेत..! त्यामुळे एखाद्या अधिकाऱ्याला पदभार मिळू नये यासाठी एखाद्या कसलेल्या राजकारण्या प्रमाणे डावपेच टाकण्या पेक्षा आयुक्तांनी शहराच्या गंभीर प्रश्नावर लक्ष द्यावे हीच अपेक्षा..!